आजची शेती कर्जबाजारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी
By Admin | Updated: June 2, 2017 00:38 IST2017-06-02T00:38:14+5:302017-06-02T00:38:14+5:30
आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे.

आजची शेती कर्जबाजारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी
नरेश पुगलिया : कर्जमुक्तीसाठी बळीराजाने जागे व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यापूर्वीच्या सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा केला होता. मागील तीन वर्षांत शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. केंद्र सरकारने देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल करुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. नरेश पुगलिया यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी संपाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा पाठींबा पत्रकार परिषदेत जाहीर केला. कर्ज मुक्तीसाठी बळीराजानेही जागे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या संपाचे राज्यात लोन पसरत आहे. विदर्भातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकरी जगेल तर देश जगेल याचे भान राज्य व केंद्र सरकारने ठेवावे व ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन हमी भावाची घोषणा करावी, अशी मागणीही पुगलिया यांनी यावेळी केली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतमालाला अत्यंत कमी भाव आहे ही कबुली देत होते. सत्ता प्राप्ती झाल्यास कृषी उत्पादनास लागतपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त मुनापा हे वचनसुद्धा दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी नंदु नागरकर, अॅड. अविनाश ठावरी, रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, गजानन गावंडे, नगरसेवक संजय महाडोळे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, नगरसेवक नीलेश खोब्रागडे उपस्थित होते.