उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
By Admin | Updated: February 23, 2017 00:33 IST2017-02-23T00:33:10+5:302017-02-23T00:33:10+5:30
मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले. तब्बल आठ दिवसांनी २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
उत्कंठा वाढली : कोण मारणार बाजी, सर्वांनाच उत्सुकता
चंद्रपूर : मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले. तब्बल आठ दिवसांनी २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढली असून कोण बाजी मारणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गुरूवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारपर्यंत सर्व उमेदवारांच्या भाग्याचा फैसला जाहीर होणार आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत अनेक बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काही नवख्याचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या होत्या.
या निवडणुकीत आघाडी व युतीची ताटातुट झाल्याने सर्व पक्षांनी वेगळी चूल मांडून निवडणूक लढविली. त्यात राष्ट्रीयकृत पक्षासह अपक्ष, आघाडीचे उमेदवार रिंगणात आल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती. मात्र गतवेळपेक्षा यावेळेस मतदानाचाही टक्का वाढला. त्यामुळे कोणत्या उमेदवाराने कुणाच्या मतांवर गदा आणली, हे निकालाअंती गुरूवारी दुपारनंतरच समजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
८३४ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषदेच्या ५६ गटासाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. यात १६५ पुरूष तर १५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर १५ पंचायत समित्यांच्या ११२ गणासाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. यात २६४ पुरूष उमेदवार तर २५५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होईल.
मतमोजणी पर्यवेक्षक व सहायकाची नियुक्ती
जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता संबधित तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नियोजन पार पडले आहे.
आपणच निवडून येण्याचा उमेदवारांना विश्वास
जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी उभे असलेल्या काही उमेदवारांनी आपणच निवडून येणार असा विश्वास पक्का केला आहे. त्यांनी गुलाल व फटाके खरेदीसाठी कार्यकर्त्यांना आदेशही देऊन टाकल्याचे कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाले. जल्लोष व मिरवणूक कुठून काढायची याचेही काहींचे नियोजन झाले आहे.
एकाच वेळी गट व गणाची मतमोजणी
बल्लारपूर : जिल्हा परिषद गटाची व पंचायत समितीच्या गणाची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. यासाठी बल्लारपुरात आठ टेबलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-बामणी जिल्हा परिषद गटात सहा उमेदवार रिंगणात होते. पळसगाव-कोठारी गटात चार महिला उमेदवार, विसापूर गणात चार महिला तर बामणी गणात पाच जण रिंगणात होते. कोठारी गणातून चार उमेदवारांच्या निवडणुकीतील परीक्षेचा निकाल मतमोजणीतून बाहेर पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विकास अहीर यांनी मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात सर्व तालुका मुख्यालयी मतमोजणी होणार असल्याने मतमोजणी स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निकालानंतर उमेदवार व कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असतात. तसेच मतमोजणी परिसरातच फटाकेही फोडत असतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
आज ठरणार २३ व्या मिनी मंत्रालयाचे शिलेदार
चिमूर : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या व गाव खेड्यात शासनाच्या अनेक योजना राबविण्याचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाते. येथूनच राज्यात विधानसभेचे आमदारही घडतात. त्यामुळे जिल्हा परिषदेला विधानसभा आमदारांची शाळा म्हणूनच बघीतले जाते. गुरूवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ शिलेदारांची निवड इव्हीएम मशीनद्वारे होणार आहे. यामध्ये कोणाचे नशीब फडफडणार आहे, हे गुरुवारला माहित होणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या शिलेदाराची निवड १९६२ ला झाली होती. चंद्रपूर जिल्हा परिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक १९६२ ला झाली होती. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून अब्दुल शफीक यांची निवड करण्यात आली. त्यांनी १९६२ ते १९७२ पर्यंत कारभार सांभाळला होता.