आज नदी पूजनाने होणार जल सप्ताहाला प्रारंभ
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:22+5:302016-03-16T08:35:22+5:30
पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

आज नदी पूजनाने होणार जल सप्ताहाला प्रारंभ
जिल्ह्यात विविध कार्यक्रम : २० मार्चला जल दौड
चंद्रपूर : पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी १६ मार्च ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ मार्च रोजी विविध नद्यांच्या जलाचे पूजन करण्यात येणार असून २० मार्च रोजी जटपुरा गेट ते गांधी चौक जलदौड आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित होणार आहे.
१६ मार्चला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन व विविध नद्यांच्या जलाचे पूजन, स्मरणिका प्रकाशन, विभागवार सादरीकरण, चित्ररथास हिरवी झेंडी दाखविणे आदी कार्यक्रम दाताळा मार्गावरील इरई नदी पुलाजवळील बालाजी मंदिरालगत सकाळी ८ वाजता होणार आहे.
१७ ते २१ मार्च पाण्याची बचत व महत्व याबाबत चर्चासत्रे, पाणी वापर संस्थेचे महत्त्व, कार्यशाळा व माहिती देणे तसेच चित्ररथाद्वारे जलजागृती, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावात जलदिंडी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाद्वारे जिल्हयात विविध तालुकास्तरावर व व्यापक स्वरूपात जलजागृती करण्यात येणार आहे. २० मार्चला सकाळी जलजागृती जलदौडीचे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. ही दौड जटपूरा गेट ते गांधीचौक व पुन्हा जटपूरा गेट या मार्गाने होईल. या जलदौडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२२ मार्चला जलसाक्षरता सांस्कृतिक कार्यक्रम, जलजागृती सप्ताहाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात दुपारी २ वाजतापासून आयोजित करण्यात आले आहे.
या सप्ताहात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनुने, कार्यकारी अभियंता खडकी व कार्यकारी अभियंता ए.बी. भाले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
२२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी १६ ते २२ मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जल जागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यात पाण्यासंबंधी कार्यरत असलेल्या कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास या सर्व विभागांमार्फत जलजागृतीबाबत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यात एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पाची उभारणी व सिंचन व्यवस्थापन ही महत्त्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्यामुळे जल जागृती सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांशी संपर्क करून समाजात जल साक्षरता-जागृती निर्माण करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागावर आहे. त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हा जल जागृती सप्ताहामध्ये जलसंपदा विभागामार्फत कार्यक्रम आखले आहेत.