आज गणरायाला निरोप

By Admin | Updated: September 27, 2015 00:43 IST2015-09-27T00:43:11+5:302015-09-27T00:43:11+5:30

१० दिवस पूजन केल्यानंतर रविवारी २७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात येणार आहे.

Today, go to Ganaraya | आज गणरायाला निरोप

आज गणरायाला निरोप

चंद्रपूर : १० दिवस पूजन केल्यानंतर रविवारी २७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील पारंपरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर यावेळी पहिल्यांदाच गणेश विसर्जन होत असल्याने अवैध दारूविक्री व मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. वरोरा तसेच बल्लारपूर शहरातील गणेश विसर्जनही करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात सुमारे ५०० सार्वजनिक गणेश मंडळ आहे. यातील निम्मे मंडळ उद्याच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
चंद्रपुरातील विसर्जन मिरणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातील भाविक येथे येतात. यावेळी विसर्जन रविवारी आल्याने मिरवणूक बघण्यासाठी भाविकांची संख्या चांगलीच वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घरगुती गणेशाचे विसर्जन स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झाले आहे. काही सार्वजनिक मंडळांनीही गणेश विसर्जन उरकले आहे.
त्यामुळे रामाळा तलाव व इरई नदीचे घाट स्वच्छ व सुरक्षित करण्यात आले आहे. उद्या या विसर्जनस्थळीही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कठडेही लावण्यात आले आहेत.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने शिवाजी चौक, संजय गांधी मार्केट, दाताळा रोड, रामाळा तलाव, बंगाली कॅम्प, झोन क्र. ३ येथे विसर्जन कुंड व निर्माल्य कलशची व्यवस्था केली आहे. याला शहरातील गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. शुक्रवारपर्यंत पाच विसर्जन कुंडात १ हजार ११३ श्रीगणेशाचे विसर्जन झाले आहे.
शहरातील एकमेव तलाव असलेल्या रामाळा तलावात गणपती विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये व पर्यावरणाचे समतोल कायम राहावे याकरिता चंद्रपूर महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. भाविकांना गणरायाचे विसर्जन सुलभ व योग्यरीतीने करता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेशभक्त व मंडळांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी स्वागतद्वार उभारण्यात आले आहे. जटपुरा गेट व गांधी चौकात जिल्हा प्रशासनाने मचानी उभारल्या असून या मचानीतून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी गणेशमंडळांचे पुष्पवर्षावाने स्वागतही केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

बंदोबस्तासाठी तीन हजारांवर पोलीस कर्मचारी
गणेशोत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल तीन हजारच्यावर पोलीस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. यात पोलीस दल, गृहरक्षक दल, आणि आयटीबीटीच्या (इंदूर तिबेटीयन बॉर्डर पोलीस) एका तुकडीचा समावेश आहे. गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी, यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात करण्यात आले आहेत. यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. चंद्रपूर शहरातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक चंद्रपुरात दाखल होतात. शहरात मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेत काही गुंडप्रवृत्तीचे विकृत तरूण या मिरवणुकीत दाखल होतात. त्यांच्याकडून युवतींची छेडखानी करण्याचे प्रकारही घडतात. या युवकांच्या बंदोबस्तासाठी साध्या वेशातील महिला पोलीस शिपायी तैनात राहणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव दारू विरहीत साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. गणेशाची स्थापना, मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीत मद्यप्राशन करणाऱ्या भक्तावर पोलिसांची विशेष नजर आहे. नागरिकांनी उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन एसपींनी केले आहे.

प्रशासन सज्ज
गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. शहरातील काही चौकांमध्ये मचानी उभारण्यात आल्या असून यातून पोलीस प्रशासन लक्ष केंद्रीत करणार आहे. जेटपुरागेटच्यावरून पुष्पवर्षा करण्यात येणार आहे.
स्वागत मंच
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्वागत मंच उभारण्यात येणार असून यावेळी आ. बाळू धानोरकर, सतीश भिवगडे उपस्थित राहतील.

Web Title: Today, go to Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.