आज वाजणार शाळेची पहिली घंटा
By Admin | Updated: June 27, 2016 01:18 IST2016-06-27T01:18:13+5:302016-06-27T01:18:13+5:30
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून २७ जून सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शिक्षण

आज वाजणार शाळेची पहिली घंटा
नवगतांच्या स्वागताची तयारी पूर्ण : विद्यार्थ्यांचा किलबिलाट होणार सुरू
चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून २७ जून सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शिक्षण विभागाने नवगतांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत. पहिल्याच दिवशी सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५७२ प्राथमिक शाळा आहेत. तर २०३ खासगी प्राथमिक शाळा व ४९८ माध्यमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७२ प्रामिक शाळांमध्ये जवळपास ११ हजारच्या आसपास विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे सर्व शाळांना निर्देश असून या कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पहिल्या दिवशी गावात प्रभात फेरी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे पुस्तकाचे वाटप, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला फूल देऊन स्वागत, शालेय पोषण आहारात गोड पदार्थ जेवू घालणे असे कार्यक्रम घेण्यात येणार असून याबाबत सर्व शाळांनी नियोजन केल्याची माहिती, शिक्षण विभाग (प्राथ.) यांनी दिली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व तो नियमीत शाळेत यावा, यासाठी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याचा अविस्मरणीय क्षण राहील, याची काळजी घेण्यात शिक्षण विभाग व्यस्त आहे. शिक्षण विभागासह राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना प्रवेशोत्सवासाठी शाळानिहाय निमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व शाळांतील शिक्षकांना वर्षभर करायच्या कामांचा संकल्प करायचा असून १०० टक्के पटनोंदणी व दर्जेदार शिक्षणाचा निर्धार करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. एकुणच सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचा किलबिलाट आता सुरू होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शैक्षणिक साहित्याचे
दुकाने सजली
४शाळा सुरू होण्याच्या तोंडावर चंद्रपूरसह अनेक शहर व ग्रामीण भागातही शैक्षणिक साहित्याने दुकाने सजली आहेत. पाठ्यपुस्तके, दफ्तर, स्टडी टेबल असे विविध साहित्य विक्रीचे दुकान लागली असून चंद्रपुरात अनेक मार्गावर रस्त्यावरच दुकाने लागलेली आहेत.