आजपासून चंद्रपुरात जिल्हा ग्रंथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 01:36 IST2016-02-12T01:36:27+5:302016-02-12T01:36:27+5:30
चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून चंद्रपुरात जिल्हा ग्रंथोत्सव
विठ्ठल वाघांच्या हस्ते उद्घाटन : भीमराव पांचाळेंच्या गझलांची मेजवानी
चंद्रपूर : चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. गझल नवाज भिमराव पांचाळे यांचे गायन, कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, व्याख्यान, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन आदी विविध भरगच्च साहित्यीक मेजवानीचा आनंद साहित्य रसिकांना लुटता येणार आहे. ग्रंथ विक्री स्टॉलवर पुस्तक खरेदी करता येईल.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन स्थानिक कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हायस्कुलच्या पटांगणात करण्यात आलेले आहे.
या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कस्तुरबा गांधी मार्गावरुन सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीव्दारे होईल. या ग्रंथदिंडीचे उदघाटन ग्रंथपूजन करुन महापौर राखी कंचलार्वार यांचे हस्ते होईल. या ग्रंथ दिंडीमध्ये चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शाळेचे बँड पथक, स्काऊट गाईड, आर.एस.पी.चे विद्यार्थी उपस्थित राहतील. चंद्रपूर शहर आणि विविध तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनीही उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी ११ वाजता ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात मराठीचे प्रसिध्द साहित्यकार कवी प्रा.डॉ.विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार उपस्थित राहतील. ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि २५ पुस्तक केंद्राच्या दालनाचे उदघाटन करण्यात येईल.
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता बाल साहित्यकार प्रा.डॉ.बानो सरताज काजी यांच्या अध्यक्षतेखाली ‘बाल साहित्य खरेच बालकांपर्यंत पोहचते काय’ या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता पुस्तक प्रकाशनाचा समारंभ तर संध्याकाळी ६ वाजता कविसंमेलनाचे आयोजन वरोरा येथील कवी ना.गो.थुटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले आहे.
१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ.परमानंद बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रंथ हाच संस्कृतीचा आधार’ या विषयावर परिसंवाद. दुपारी २ वाजता नागपूर येथील व्याख्याते डॉ.श्रीकांत गोडबोले यांचे ‘वाचन संस्कृती आणि ग्रंथालय’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ४ वाजता कथाकथनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता गझल नवाज भिमराव पांचाळे यांचा मराठी गीत गझलांचा बहारदार कार्यक्रम होईल.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ.श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘युवा पिढी वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे काय’ या विषयावर परिसंवाद. दुपारी ४ वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन शिवशंकर घुगुल यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
संध्याकाळी ७ वाजता समारोपीय कार्यक्रम केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. याप्रसंगी आमदार शोभाताई फडणवीस, नितेश भांगडिया, नाना शामकुळे, विजय वडेट्टीवार, संजय धोटे, सुरेश धानोरकर व कितीर्कुमार भांगडिया उपस्थित राहतील.
या ग्रंथोत्सवात राज्यातील विविध शहरातील नामांकित प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल्स राहतील. चंद्रपूर जिल्हयातील जनतेने, साहित्य रसिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रा.वा.कोरे, आयोजन समितीचे सदस्य तथा राज्य ग्रंथालय संघ मुेंबईचे अध्यक्ष अनिल बोरगमवार आणि समिती सदस्य मुरलीमनोहर व्यास यांनी केले आहे. (प्रतिनिधी)