आज जिल्ह्यासाठी ब्रह्मपुरी बंद
By Admin | Updated: August 6, 2016 00:39 IST2016-08-06T00:39:01+5:302016-08-06T00:39:01+5:30
सन १९९२ पासूनच्या ब्रह्मपुरी जिल्हा मागणीसाठी पुन्हा जोर पकडलेला आहे.

आज जिल्ह्यासाठी ब्रह्मपुरी बंद
मोर्चाचे आयोजन: हजारो नागरिक सहभागी होणार
ब्रह्मपुरी : सन १९९२ पासूनच्या ब्रह्मपुरी जिल्हा मागणीसाठी पुन्हा जोर पकडलेला आहे. त्यासाठी शनिवारला, ब्रह्मपुरी बंदचे आयोजन सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करुन मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर म्हणजे ब्रह्मपुरी होय. शिक्षण, वैद्यकीय सोई मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. हे शहर दळणवळणासाठी अगदी मोक्याचे आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व इतर शहराकडे जाण्यायेण्यासाठी मध्यवर्ती केंद्र आहे. रेल्वे मार्ग, एसटी बसेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. यापूर्वीसुध्दा ब्रह्मपुरी चे नाव जिल्हा म्हणून घोषित झाले होते. मात्र ऐनवेळी त्यात बदल करून गडचिरोलीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी गडचिरोली व इतर परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा बनविण्यात आल्यामुळे ब्रह्मपुरीकरांनी भावना समजून घेतल्या. परंतु आता मात्र ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे, अशी येथील नागरिकांची आग्रही मागणी आहे. जिल्हा निर्माण कृती समिती, युवा जिल्हा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना, सिनीअर सिटीझन फोरम, सर्वपक्षांचे नेते व कार्यकर्ते, महिला आघाडी, व्यापारी मंडळ, डॉक्टर, इंजिनिअर तथा शहरातील सर्व घटक मोर्चात सहभागी होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)