आज क्रांती जिल्ह्यासाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा

By Admin | Updated: August 4, 2016 00:44 IST2016-08-04T00:44:13+5:302016-08-04T00:44:13+5:30

नवीन जिल्हे निर्मितीबाबत राज्य शासन सकारात्मक आहे

Today, the All-party Quarrel for Revolution District | आज क्रांती जिल्ह्यासाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा

आज क्रांती जिल्ह्यासाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा

निवेदन देणार : १० हजार नागरिक सहभागी होणार
चिमूर : नवीन जिल्हे निर्मितीबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्यामुळे ४६ वर्षे जुन्या चिमूर जिल्हा मागणीला गती यावी, म्हणून गुरुवारी दुपारी १ वाजता क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
ब्रिटिश राजवटीत जिल्ह्याचा (परगणा) दर्जा प्राप्त असलेल्या चिमूर शहराला स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यासाठी चिमूर संघर्ष समिती, चिमूर जिल्हा कृती समिती आणि सर्व राजकीय पक्षांच्या माध्यमातून अनेक आंदोलने करण्यात आली. जिल्ह्याची मागणी करता-करता चिमूरकरांची ४६ वर्षे निघून गेली. मात्र चिमूरकरांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. मागील काही महिन्यांपूर्वी शासनस्तरावरुन राज्यातील प्रस्तावित नवीन २२ जिल्हे निर्मितीच्या यादीमध्ये चिमूरचे नाव आल्याने चिमूरकरांची जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहचली. चिमूर क्रांती जिल्ह्याच्या आंदोलनाच्या निर्मितीसाठी तालुक्यात ठिकठिकाणी सर्वपक्षीय बैठकाचे आयोजन करण्यात आले. त्या बैठकीनुसार तालुक्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील. तर मूकमोर्चात स्वातंत्र्य संग्राम सैनिक व चिमूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष दामोधर काळे (गुरुजी) यांच्या नेतृत्वात आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बालाजी मंदिराच्या पटांगणावतून गुरुवारी दुपारी १ वाजता निघणार आहे. चिमूरक्रांती जिल्ह्यासाठी १६ वर्षापूर्वी काढलेल्या मोर्चाने उग्ररुप धारण करुन तहसील कार्यालयाची जाळपोळ केली होती. या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी सगिता राठोड व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

५ जानेवारी २००० च्या आठवणी ताज्या
चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी ५ जानेवारी २००० रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत शांततेत आला. मात्र तहसीलदारांना निवेदन देण्याच्या संदर्भात वाद होऊन मोर्चेकरांनी उग्ररुप धारण करुन तहसील कार्यालयाची जाळपोळ केली होती.

शहरातील वाहतूक बंद
चिमूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खडसंगीकडून येणारी वाहतूक रुग्णालयाजवळ थांबवण्यात येईल. उमरेड- पिंपळनेरी रोडची वाहतूक हजारे पेट्रोल पंपजवळ, जांभूळघाट व नेरी- सिंदेवाही मार्गाची वाहतूक आर.टी.एम. महाविद्यालयाजवळ थांबविण्यात येईल.

चिमूर क्रांतीनगरीच्या नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचारी दंगा नियंत्रण पथकाची तुकडीसह २५ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मूक मोर्चावर नजर ठेवून राहणार आहे.
- दिनेश लबडे,
ठाणेदार चिमूर

Web Title: Today, the All-party Quarrel for Revolution District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.