तिवारी गटाची अखेर भाजपाशी फारकत
By Admin | Updated: December 19, 2015 00:47 IST2015-12-19T00:47:04+5:302015-12-19T00:47:04+5:30
शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे.

तिवारी गटाची अखेर भाजपाशी फारकत
विकासात सहकार्य नाही : तिवारी-लहामगे गटाचा आरोप
चंद्रपूर : शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. मात्र हा पाठिंबा परत घेत असल्याची माहिती तिवारी-लहामगे गटाने दिली. यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपात प्रवेश घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकण्यात आला. मात्र या गटाने काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडून व लोकप्रतिनिधीकडून त्यांची उपेक्षा केली जात आहे. परिणामी हा निर्णय घ्यावा लागल्याचेही यावेळी रामू तिवारी आणि संतोष लहामगे यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांच्या कक्षात तिवारी आणि लहामगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी अनेकवेळा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार नाना श्यामकुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. या नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. मनपा आयुक्तांची कार्यप्रणालीही नगरसेवकविरोधी आहे. त्यामुळे मनपातील कामकाज प्रभावित होत आहे. समर्थन परत घेतल्याचे अधिकृत पत्र लवकरच भाजपाला दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
समर्थन परत घेतल्याने भाजपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या पदावर काही परिणाम होणार नाही. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जायचे आहे, असे सांगितले. उपमहापौर वसंता देशमुख यांनी मात्र याबाबत कॉंग्रेस नगरसेवकांशी चर्चा केली जाईल, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)