वेतनाअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: February 27, 2015 00:56 IST2015-02-27T00:56:35+5:302015-02-27T00:56:35+5:30
कोरपना तालुक्यातील मुर्ली अॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे पगार मागील दोन महिन्यांपासून झालेले नाही.

वेतनाअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ
नांदाफाटा: कोरपना तालुक्यातील मुर्ली अॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे पगार मागील दोन महिन्यांपासून झालेले नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून नारंडा गावानजीक ही कंपनी सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यासह इतर राज्यातील ३०० ते ४०० कामगार सद्यस्थितीत काम करीत आहेत. यापूर्वीही कामगारांच्या पगाराबाबत अनेकदा प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पगार पूर्ववत सुरु करण्यात आले. मात्र आता पुन्हा कंपनी प्रशासनाने कामगारांच्या वेतनाबाबत दिरंगाई दाखविली असून कामगारांचे मोठे हाल होताना दिसत आहे. कंपनीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमीन यापूर्वी दिल्या. मात्र त्याचा कमी मोबदला व नियमित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना वेतनही वेळेवर दिल्या जात नाही. याचबरोबर कामगारांच्या मुलभूत सुविधाबाबत कंपनी प्रशासन उदासिन धोरण बाळगून आहे. आरोग्य स्वच्छपाणी, धूळ नियंत्रण संयंत्र, वृक्षारोपण, सुरक्षतेबाबत अनेक प्रश्न कंपनी परिसरात निर्माण झालेले दिसत आहे. कंपनी स्थापनेनंतर दत्तक गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे कंपनी प्रशासनामार्फत सांगण्यात आले. परंतु तसेही झालेले नाही.
कंपनीत काम करणारे अर्ध्याहून अधिक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे. यातच गडचांदूर, नारंडा, वनसडी, नांदाफाटा येथे किरायाने सदर कामगार वास्तव्यास आहेत. महिन्याला तीन ते चार हजार रुपयात काम करणारे कंत्राटी कामगारांचे कुटुंब कंपनी प्रशासनावर विसंबून आहे. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळल्याने जगायचे कसे, असा प्रश्न कामगारांपुढे आ वासून उभा आहे. पगार मिळत नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर होताना दिसत आहे. तालुक्यातील इतर सिमेंट कंपन्या कामगारांना बस सुविधा, क्वाटर्स, रुग्णालय, पिण्याचे पाणी, सुरक्षा साहित्य, वेतन आदी नियमित देत असताना मुर्ली अॅग्रो प्रशासन मात्र कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप कामगार करीत आहे. त्वरित वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. याबाबत कंपनीचे प्रकल्प अधिकारी पराते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंपनीत सध्या उत्पादन बंद आहे. यामुळे कामगारांना महिनाभर काम मिळत नाही. त्यामुळे वेतन देण्यास विलंब होत आहे. (वार्ताहर)