क्वासी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:58 IST2019-02-24T22:57:51+5:302019-02-24T22:58:34+5:30
बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

क्वासी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कॅन्टीन सुरु करावी, अन्यथा सोमवारपासून बल्लारपूर रेल्वे स्थानकासमोर उपोषण करण्याचा इशारा चंद्रपूर प्रेस क्लबध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडित क्वासी कर्मचारी अनतप्पा तमन्ना वाकटी व आदर्श मीडिया असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी दिला.
सन १९९९ मध्ये अनतप्पा वाकटी यांची बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर क्वासी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन २००० मध्ये त्यांना सर्व सोई सुविधा पुरविण्यात आल्या. सन २००५ मध्ये त्यांना स्थायी करण्याचे पत्र प्रशासनाने पाठविले. दरम्यान त्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. परंतु, त्यांना स्थायी करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन सुरु करुन आपला उदरनिर्वाह सुरु केला. दरम्यान रेल्वे स्टेशनवर वीआयपी प्रतीक्षालयाची स्थापना करण्याचे पत्र आल्यानंतर ती कॅन्टीन बंद करण्यात आली. त्याठिकाणी प्रतीक्षालयाच्या बांधकाम करण्यास सुरुवात केली. यावेळी कॅन्टीनसाठी दुसरी जागा देणे अनिवार्य असताना त्यांनी कोणतीही जागा उपलब्ध करुन दिली नाही. दरम्यान सदर जागा प्रतिक्षालयासाठी कमी पडत असल्याने दुसऱ्या ठिकाणी प्रतीक्षाल बांधावे, अशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यानी रेल्वे विभागाला दिल्या. तेव्हा कँटिंगच्या जागेवर पूर्ववत कँटिंग सुरु करायला हवे होते. मात्र रेल्वे विभागाने तसे केले नाही. परिणामी सन २०१७ पासून कॅन्टीन बंद आहे. तेव्हापासून क्वॉसी कर्मचारी व कॅटिंगमध्ये काम करणारे सेल्समेन बेकार आहेत.
क्वॉसी कर्मचारी वाकटी पत्रकार परिषदेत म्हणाले, अनेक विभागाना निवेदनातून समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. एकीकडे सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करते. तर दुसरीकडे बेरोजगार करीत आहे. त्यामुळे आपण चंद्रशेखर तुरकर यांच्यासमेवत उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.
कॅन्टीन नसणारे जंक्शन
रेल्वे प्रवासी व कर्मचाऱ्यांना सोईचे व्हावे यासाठी रेल्वेस्टेशनवर कँटिंगवर छोटी-मोठी कँटिंग असते. मात्र बल्लारपूर जक्शन याला अपवाद आहे. बल्लारपूर जक्शनवर सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस अशा अनेक रेल्वेगाड्या थांबतात. त्यामुळे याठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी बसत व उतरत असतात. त्यामुळे कँटिंगची गरज आहे.