शौचालयाची उदासिनता ठरली ‘हिरकन्ये’साठी काळ
By Admin | Updated: November 13, 2015 01:06 IST2015-11-13T01:06:37+5:302015-11-13T01:06:37+5:30
शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

शौचालयाची उदासिनता ठरली ‘हिरकन्ये’साठी काळ
राजकुमार चुनारकर खडसंगी
शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदासिनतेमुळे ‘हागणदारी मुक्त’ गाव संकल्पना पूर्णत्वास आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक महिलांसह, नागरिक आजही उघड्यावर शौचास जातात. यामुळेच चिमूर तालुक्यातील आंबोली येथील एका ३५ वर्षीय महिलेला एका नराधमाच्या वासनेला बळी पडत जीव गमावावा लागला.
राज्यात आघाडी शासनाच्या काळापासून संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. त्याच अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त गाव योजनाही राबविण्यात आल्या. याच अभियानातून अनेक गावांत शौचालय बांधकाम करण्यात आले. भाजपा शासनानेसुद्धा या अभियानात काही बदल करीत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयाचा निधी देण्यात येतो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिकांत शौचालयाविषयी उदासिनता असल्याने अनेक गावात शौचालयाची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे अनेक नागरिक आजही उघड्यावरच शौचाससाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात तालुक्यात पहावयास मिळते.
चिमूर तालुक्यातील आंबोली या दोन हजार लोकवस्तीच्या गावातील एक दाम्पत्य आपल्या दोन मुलासह जीवन जगत होते. दिवाळीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने गावात फटाक्याच्या आतिषबाजी सुरू होती. १० नोव्हेंबरच्या सायकाळी ७ वाजताच्या दरम्यान, हिरकन्या स्वयंपाकाच्या तयारीत होती. याच दरम्यान, ती शौचासाठी गावाच्या काही मिटर अंतरावरील शेतात गेली. शेतात एकटी पाहून गावातीलच युवक आशिष धनराज निखाडे या नराधमाने दारूच्या नशेत हिरकन्येला आपल्या वासनापूर्तीचा बळी बनविले.
अकोला जिल्ह्यातील एका विवाहितेने आपले मंगळसूत्र विकून घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा या घटनेने शासन खडबडून जागे झाले. याच महिलेला शासनाने ब्रँड अॅम्बेसिडर बनविले. सत्कारही केला तर काही महिन्याअगोदर पुणे जिल्ह्यात विवाहामध्ये तयार शौचालय भेट दिल्याची घटनाही ताजीच आहे.
शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानाचा लाभ घेत घरी शौचालय असते तर हिरकन्येला शौचासाठी बाहेर जावे लागले नसते आणि त्या नराधमाच्या वासनेस हिरकन्या बळी पडली नसती.