टोले नांदगावच्या जंगलात वाघाचा थरार

By Admin | Updated: September 6, 2016 00:38 IST2016-09-06T00:38:05+5:302016-09-06T00:38:05+5:30

गुरांना चारण्यासाठी जंगलात गेलेल्या तरुणाच्या मागे वाघ लागला. स्वत:च्या बचावासाठी तो रांजीच्या झाडावर चढला.

Tigers thump in Tale Nandgaon forest | टोले नांदगावच्या जंगलात वाघाचा थरार

टोले नांदगावच्या जंगलात वाघाचा थरार

झाडावर चढलेल्या तरुणाला ओढत नेले : वडील धावून आल्याने बचावला
गोंडपिपरी : गुरांना चारण्यासाठी जंगलात गेलेल्या तरुणाच्या मागे वाघ लागला. स्वत:च्या बचावासाठी तो रांजीच्या झाडावर चढला. मात्र वजनाने झाड वाकला अन् खाली असलेल्या वाघाने त्याच्या पायावर झडप घातली. त्याला झाडावरुन खाली ओढले आणि काही अंतरावर ओढत नेले. जीवाच्या आकांताने तो ओरडू लागला. पोराचा आवाज ऐकून धावत आलेल्या वडीलाने आरडाओरड केली. नेमके त्याचवेळी जनावरांचा कळपही तिथे आल्याने वाघाने तरुणाला सोडून कळपाकडे झेप घेतली.
हा थरार गोंडपिंपरी तालुक्यातील नांदगाव एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ५१ मध्ये रविवारी दुपारी घडला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या त्या तरुणाला एफडीसीएमने तत्काळ मदत तर दिलीच नाही उलट सुट्टीचे कारण पुढे करत अर्जही नाकारले. त्यामुळे एफडीसीएमच्या कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे.
टोले नांदगाव येथील गुराखी साईनाथ रामजी येलमुले (२५) हा युवक आपल्या वडीलासोबत जनावरांना चारण्यासाठी वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ५१ मध्ये घेवून गेला. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुरे चारत असताना साईनाथला वाघाची चाहूल लागली. काही कळायच्या आतच झुडपातून वाघ त्याच्यासमोर आला. बचावासाठी जवळ झाड नसल्याने तो जवळच असलेल्या बांबूच्या रांजीतील दोन बांबुच्या आधारावर काही उंचावर चढला. खाली असलेला वाघ त्याच्यावर छेप घेवू लागला.
वाघापासून पायाचा बचाव करण्यासाठी त्याने दोन्ही पाय वर घेतले. मात्र त्याचे वजन पेलवून न शकलेला बांबू वाकल्याने त्याच दरम्यान वाघाने झेप घेवून त्याच्या उजवा पाय पकडला अन् त्याला झाडावरून ओढू लागला. काही अंतरापर्यंत त्याला वाघाने ओढत नेले. साईनाथ जीवाच्या आकांताने ओरडून लागला. आवाज ओळखून जवळच असलेले त्याचे वडील रामजी येलमुले घटनास्थळावर धावत आले व आरडाओरड केली. नेमके त्याचवेळी जनावरांचा कळप तिथे आल्याने वाघाने साईनाथला सोडून कळपाकडे धाव घेतली.
साईनाथला ओढत नेल्याचे पाटीवर गंभीर दुखापत झाली असून उजव्या पायालाही इजा झाली आहे. त्याला तत्काळ धाबा प्राथमिक आरोग्यात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला गोंडपिपरी येथे व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती एफडीसीएम अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र साईनाथची दुखापत येवून बघण्याचे सौजन्यही वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. अर्ज घेवून गेलेल्या साईनाथच्या कुटुंबियाना सुट्टीचे कारण पुढे करत परत पाठविले. (शहर प्रतिनिधी)

आमदारांनी फोन कापला
वाघाच्या हल्यात जखमी साईनाथकडे कुणीच लक्ष देत नव्हते. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची माहिती देण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आमदार संजय धोटे यांना भ्रमणध्वनी केला. मात्र त्यांनी वारंवार फोन कापून प्रतिसाद दिला नाही. तालुका दत्तक घेण्याची घोषणा आमदार धोटे यांच्याकडून होत असली तरी अशा व्यवहाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी भजनात दंग
वनविकास महामंडळ धाब्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी उसेंडी यांचे भजनप्रेम चांगलेच चर्चेत आहे. वनक्षेत्रात वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. शिकार, अवैध वृक्षतोड या घटनात वाढ झाली असताना एफडीसीएमचे कर्मचारी मात्र गावागावात भजनात दंग दिसून येत आहेत. त्यामुळे शिकारी व चोरट्यांना रानमोकळे झाल्याने दिसून येते.

Web Title: Tigers thump in Tale Nandgaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.