कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ
By Admin | Updated: December 28, 2015 01:25 IST2015-12-28T01:25:55+5:302015-12-28T01:25:55+5:30
कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने ...

कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ
शेतकऱ्यांत दहशत : १५ दिवसात १० जनावरे ठार
कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने गावाशेजारी येऊन धुमाकूळ घातला आहे. गावातील गोठ्यात व जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर हल्ला करून दहा जनावरांना ठार केल्याने जंगल शेजारी गावात व शेतकऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
कोठारी येथील शेतकरी बबन मोरे, भाऊजी विरुटकर व दादाजी फरकाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तीन दिवस सतत हल्ला करून ठार केले तर कुडेसावली येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर गावालगत रस्त्याच्या कडेला दोन जनावरे तसेच काटवली, बामणी येथील दोन गाई व कवडजई व परसोडी येथील तीन जनावरांवर हल्ला चढवून जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याचप्रमाणे गणपूर, कन्हारगाव, देवई व भटारी येथील पाच ते सहा जणावरांना ठार केल्याची घटना घडली. कोठारी गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर बिबट्याने व वाघाने हल्ला केल्याची घटना घडली.
वाघ-बिबट गावाशेजारी गावात येऊन हल्ला करण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनविभागाने वेळीच दखल घेऊन मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्यात यावी.
गुराख्यात दहशत
जंगलात जनावरांना चराईसाठी जाणाऱ्या गुराख्यांना वाघ-बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने जंगलात जनावरांसह प्रवेश करणे दुरापास्त झाले आहे. अशात जनावरे जंगलात नेणे धोकादायक झाले आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांपासून गुराख्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून जनावरांची चराई गावाशेजारी केली जात आहे.
शेतकऱ्यांनी जागल बंद केली
शेतात शेतपिकांची राखण करण्यासाठी व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी शेतकरी जागल करीत आहेत. मात्र वाघ-बिबट्याच्या दैनदिन उपद्रवाने शेतकरी दहशतीत असून आता रात्रीची जागल बंद केल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला तर उभ्या पिकांची नासाडी जंगली प्राणी करीत आहेत. तसेच जनावरांवर वाघ-बिबटाचे हल्ले होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निसर्ग व जंगली प्राणी तसेच शासनाच्या नियमात अडकलेले शेतकरी मदत कुणाकडे मागावी, या विवंचनेत सापडले आहेत.
पादचाऱ्यांना वाघ-बिबटाचे दर्शन
कोठारी-तोहोगाव, कोठारी-गोंडपिपरी, देवई व कन्हारगाव या मार्गावरुन दुचाकी, चारचाकी व पायदळ जाणाऱ्या लोकांना वाघाची जोडी तसेच बिबटाची जोडीचे रोज वेळीअवेळी दर्शन होते. यामुळे पादचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ६ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक बंद होत आहे. सहा वाजतानंतर कुणीही या मार्गावरुन जाण्याची हिंमत करीत नाही. सर्व रस्त्यावर संध्याकाळी शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहेत.
बंदोबस्ताची मागणी
कोठारी वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे व शेती जंगल शेजारी असून वाघ-बिबटाच्या दहशतीने सर्व परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अशात वनविभागाने या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान व नुकसान भरपाईची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धीरज बांबोडे यांनी केली आहे.