उश्राळा, सोमनाथ परिसरात वाघाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:03+5:302021-01-18T04:26:03+5:30
मूल तालुक्यात वनविभागाचे पाच वनपरिक्षेत्राधिकारी कार्यरत आहे, मूल तालुक्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर जंगलव्याप्त परिसर आहे. यामुळे वन्यप्राण्यांची याठिकाणी नेहमीच ...

उश्राळा, सोमनाथ परिसरात वाघाचा धुमाकूळ
मूल तालुक्यात वनविभागाचे पाच वनपरिक्षेत्राधिकारी कार्यरत आहे, मूल तालुक्याला लागूनच मोठ्या प्रमाणावर जंगलव्याप्त परिसर आहे. यामुळे वन्यप्राण्यांची याठिकाणी नेहमीच रेलचेल असते, अनेकदा वाघ व इतर वन्यप्राण्यांमुळे अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, मात्र वन्यप्राण्याचे हल्ले अजूनही बंद झालेले नाही, काही दिवसांपूर्वी उश्राळा येथील वसंत बोबाटे यांची म्हैस तर वासुदेव कोटनाके यांची गाय वाघाने ठार केली. यामुळे सदर इसमाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोमनाथ आमटे फार्म, उश्राळा नदी व भादुर्णा परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांचा धुमाकूळ सुरू आहे. ५ ते ६ वाघ या परिसरात फिरत असल्याची उश्राळा येथे चर्चा आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बॉक्स
आतापर्यंत ३० ते ४० जनावरे ठार
मूल बफर क्षेत्राचे जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. वाघाला राहण्यासाठी झुडपाची गरज असते आणि सोमनाथ आमटे फार्मजवळ झुडपाची गर्दी आहे. यामुळे या परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. झुडुपे काढण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. मागील काही दिवसांपासून रोज वन्यप्राण्यांचे हल्ले सुरू आहे. बफर क्षेत्रातील जंगलात गेलेल्या ३० ते ४० जनावरांना आतापर्यंत वाघाने ठार मारले आहे. त्यामुळे जनावरांवर परत हल्ला होऊ नये यासाठी शेताजवळ असलेले झुडूप काढून टाकावे, अशी प्रतिक्रिया बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी जि. आर. नायगमकर यांनी दिली.