वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित
By Admin | Updated: February 3, 2016 00:56 IST2016-02-03T00:56:27+5:302016-02-03T00:56:27+5:30
नागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित
ग्रामस्थांना चिंता : येणारा मोहफूल व तेंदू हंगाम कसा जाणार ?
घनश्याम नवघडे नागभीड
नागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वाघांच्या या कारवायांनी या तालुक्यातील ग्रामीण जीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. लवकरच येणारा मोह फूल आणि तेंदूचा हंगाम कसा करायचा, असा प्रश्न या ग्रामीण जीवनासमोर निर्माण झाला आहे.
नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. तालुक्याच्या कोणत्याही भूभागावर कटाक्ष टाकला तर जंगलच जंगल दिसेल. या जंगलात वाघ आणि बिबट या हिंस्त्र पशुंचे वास्तव्य आहे, हे लपून राहिले नसले तरी परिस्थितीशी सामना करुन या जंगल व्याप्त गावातील लोक आपली दिनचर्चा निभावत आहेत. पण तेंदू आणि मोह हा हंगाम प्रत्यक्ष जंगलाशी निगडीत असल्याने आणि काही काही कुटुंबांची त्याच्यावरच उपजिविका असल्याने आणि त्यातच वाघांच्या कारवाया वाढल्याने या हंगामापासून वंचित तर राहणार नाही ना, अशी भीती या जंगलव्याप्त गावात निर्माण झाली आहे.
या तालुक्यातील गोविंदपूर परिसर, मौशी ढोरपा परिसर, बोंड, बाळापूर परिसर, कोसंबी गवळी परिसर, डोंगरगाव परिसर या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ किंवा बिबट यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. या पशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना घडल्या आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या, पण दीड-दोन महिन्याअगोदर नवेगाव हुडेश्वरी आणि याच आठवड्यात नवखळा येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या दोन घटनांनी मात्र ग्रामीण जीवन हादरुन गेले आहे.
खरे तर या दोन्ही घटनांचा विचार केला तर वाघाने गावात येऊन हल्ला केला नाही. पण या घटनांचे समर्थन कोणीही करणार नाही. घटना निश्चितच दुदैवी आहेत. कारण सदर घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेले कोणाचे कोणीतरी होते. नवेगाव हुडेश्वरी जंगलात मृत्यूमुखी पडलेली ती बाई कोणाची तरी आई होती तर नवखळा येथील घटनेत मृत्यूमुखी पडलेला तो माणूस कोणाचा तरी बाप होता. या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना वनविभाग आर्थिक भरपाई देईलही. पण त्यांच्या कुटुंबियांनी गमावलेले नाते परत येणार नाहीत.
घटना घडल्या म्हणून लोक जंगलात जाणे सोडणार नाहीत पण घटना घडू नये याची खबरदारी वनविभागाने घेणे जरुजीचे आहे. यासाठी वनविभागाने लोकजागरण केले पाहिजे. अन्यथा अनुचित घटना घडण्याची शक्यता आहेच.