तिकीट निरीक्षकाने बेवारस मुलास केले पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:56+5:302021-03-22T04:25:56+5:30
बल्लारपूर (चंद्रपूर) : देशभरात कोरोनाचे तांडव माजले असताना व रेल्वे स्थानकावर कोणत्याही यात्रेकरूला विनाआरक्षण स्थानकात प्रवेश करण्याची मुभा नसतानाही ...

तिकीट निरीक्षकाने बेवारस मुलास केले पोलिसांच्या स्वाधीन
बल्लारपूर (चंद्रपूर) : देशभरात कोरोनाचे तांडव माजले असताना व रेल्वे स्थानकावर कोणत्याही यात्रेकरूला विनाआरक्षण स्थानकात प्रवेश करण्याची मुभा नसतानाही बेधडक घरून पळून आलेली लहान मुले रेल्वे स्थानकात घुसून रेल्वेगाडीत बसून प्रवास करताना दिसत आहे. अशाच एका आग्रा येथील मुलास तिकीट निरीक्षकाने चौकशी करून बल्लारशाह रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटना शनिवारी रात्रीची आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा स्थानकावरून १० वर्षीय अल्पवयीन मुलगा दक्षिण एक्स्प्रेस क्रमांक ०२७२२ या रेल्वे गाडीत बसून येत होता. नागपूर रेल्वे स्थानकानंतर हा मुलगा गाडीतील कोचमध्ये एकटाच फिरताना निरीक्षक शशीकुमार मनोज यांना दिसला. त्यांनी लगेच चौकशी केली व बल्लारशाह स्थानकावर गाडी येताच त्या मुलाला रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. आरपीएफ रेल्वे ठाण्याचे अधिकारी आर.एन.मोठे यांनी मुलाची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव दिलशाद सांगितले व आग्रा येथील घराचा पूर्ण पत्ता दिला. यावरून पोलिसांनी घरच्या कुटुंबास मुलगा सापडल्याचे कळवून त्या मुलास रेल्वे चाईल्ड लाईनचे सुरेंद्र धोडरे यांच्या स्वाधीन केले. सदर कारवाई आरपीएफ ठाण्याचे महेंद्रकुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चाईल्ड लाईनने त्या मुलास सुरक्षिततेच्या दृष्टीने चंद्रपूर बाल सुधार गृहात ठेवले आहे.