अवैध दारुविक्री प्रकरणी दोघांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा
By Admin | Updated: April 23, 2016 00:51 IST2016-04-23T00:51:15+5:302016-04-23T00:51:15+5:30
एक वर्षापुर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर अवैध दारुविक्रेते मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले.

अवैध दारुविक्री प्रकरणी दोघांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा
वरोरा न्यायालयाचा निर्णय : दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले
वरोरा : एक वर्षापुर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर अवैध दारुविक्रेते मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले. दारुबंदी असताना घरात अवैधरित्या दारुचा साठा ठेवल्याने दोघांना शेगाव पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली होती. त्या दोघांना वरोरा न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविली. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीनंतर अवैध दारु विक्रेत्यास शिक्षा सुनावल्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. गोपाल सोमनाथ डरे (४०) रा. आमडी व वाल्मिक नथ्थु वाढई रा. आष्टा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आमडी गावातील गोपाल सोमनाथ डरे यांच्या घरी २ हजार १०० रुपयाची देशी दारु आढळून आली होती.
देशी दारुच्या ३५ बॉटल जप्त करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी तपास पूर्ण करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून गोपाल डरे यास तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
तर दुसऱ्या प्रकरणात शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उईके यांनी २ मार्च २०१५ रोजी आष्टा येथील वाल्मिक नथ्थु वाढई याच्या घरून १५ बॉटल देशी दारु जप्त केली होती.
याप्रकरणी वाल्मिक वाढईवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून वाल्मिक वाढई यालाही तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. एस.आर. ठावरी यांनी बाजू मांडली. अवैध दारु बाळगल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने शिक्षा सुनाविल्याने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)