कोठारीत तीन वर्षांपासून नळ योजना ठप्प
By Admin | Updated: May 29, 2014 23:55 IST2014-05-29T23:55:05+5:302014-05-29T23:55:05+5:30
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने

कोठारीत तीन वर्षांपासून नळ योजना ठप्प
सुरेश रंगारी - कोठारी
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
१५ हजार लोकवस्ती असलेले कोठारी गाव मागील दहा वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. १९८४ मध्ये अस्तित्वात आलेली नळ योजना सध्या कुचकामी ठरली आहे. वीज देयकाचे सात लाख रुपये ग्रामपंचायतीने भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा तीन वर्षापासून खंडीत आहे. कोठारी नाल्यावर असलेली नळ योजनेची विहीर कोरडी पडली आहे. पाणी पुरवठा करणारे मोटर पंप त्याच विहिरीत दोन वर्षापासून पडून सडत आहे. ते बाहेर काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने आजवर दाखविले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी तीन कूपनलिका शासनाने खोदल्या. मात्र त्याही बंद आहेत. तांत्रिक दोष दाखवून ग्रा.पं. प्रशासनाने हात झटकले आहेत, गावात ६५ हातपंप आहेत. मात्र त्यातील पाच हातपंप निकामी झाले आहेत. ६0 हातपंपावर गावाची तहाण भागविण्यात येत आहे. त्यातही अनेक हातपंपाची स्थिती चांगली नाही. अनेक हातपंपातून पाणीच येत नाही. गावातील चार विहिरीच पाणी वापरण्यायोग्य आहे. मात्र विहीरीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील महिला प्रचंड त्रस्त आहेत.
पाण्यासाठी हातपंपावर पहाटेपासूनच महिलांची गर्दी उसळत असते. पाण्यासाठी महिलांच्या भांडणात वाढ होत आहे. दिवसभर मोलमजुरी करुन थकलेल्या महिला पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. मात्र ज्यांच्यावर विश्वास टाकून जनतेने निवडून दिले, ते पदाधिकारी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. पाण्यासाठी महिलांनी अनेकदा ग्रा.पं. कार्यालयावर समुहाने धडक देऊन मागणी केली. मात्र थातूरमातूर कारवाई करण्याचे सांगून महिलांना हुसकावून लावण्यात येते. ग्रामपंचायतीमधील पदाधिकार्यांच्या या कामचुकार धोरणाचा फटका मात्र गावकर्यांना सहन करावा लागतो आहे.