सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी तीन शाळांची निवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:16+5:302021-02-23T04:44:16+5:30

सावली : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण ...

Three schools will be selected for Savitribai Phule Quality Education Campaign | सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी तीन शाळांची निवड होणार

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी तीन शाळांची निवड होणार

सावली : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात निवड करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा धोरणास पूरक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत शालेय शिक्षण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व बालभारतीच्या मदतीने राज्यात जिल्हा परिषदेच्या मिशन १०० आदर्श शाळा उपक्रम राबविले जाणार आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची उद्दिष्टे गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा, आरोग्य, पोषण, आनंददायी शिक्षण आदी राहणार आहेत. सदर शाळांच्या निवडीबाबत काही निकष आहेत.

जिल्ह्यातून ज्या तीन शाळांची या योजनेत निवड होईल त्या शाळांमध्ये शासनाच्या कृती संगमातूनसुद्धा भौतिक सुविधांवर काम होणे अपेक्षित आहे. गावास विविध योजनांतून मिळालेले पुरस्कार, शाळेतील शिक्षकांना पुरस्कार, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांत सहभाग असलेल्या शाळेची प्राधान्याने या कार्यक्रमात निवड करणे अपेक्षित आहे. या शाळांना भेटी देऊन, शाळा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील शाळांमध्ये सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती व्हीएसटीएफच्या जिल्हा समन्वयक विद्या पाल यांनी दिली.

बॉक्स

असे आहेत निकष

ही योजना महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी राहणार आहे. शाळेची पटसंख्या १०० च्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी किमान ६० पटसंख्या निकष ठेवण्यात आलेला आहे. सदर शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी. शाळेला स्वतःची जागा असावी. गावामध्ये उत्स्फूर्त सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी बिगर आदिवासी भागात येणाऱ्या शाळातील गावांनी १० टक्के लोकसहभाग (५ टक्के लोकवाटा व ५ टक्के श्रमदान) देणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रातील गावांनी ५ टक्के लोकसहभाग (२ टक्के लोकवाटा व ३ टक्के श्रमदान) देणे अपेक्षित आहे. व्हीएसटीएफमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी लोकसहभाग आधारित उपक्रम घेणे अपेक्षित आहे.

Web Title: Three schools will be selected for Savitribai Phule Quality Education Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.