Three policemen injured along with the Thane driver in the accident | अपघातात ठाणेदारासह तीन पोलीस जखमी
अपघातात ठाणेदारासह तीन पोलीस जखमी

ठळक मुद्देउपचाराकरिता नागपुरात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : वाहनाने गस्त घालत असताना ट्रकच्या धडकेत येथील ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर घडली. विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
ठाणेदार मकेश्वर हे रात्रीच्या सुमारास सहकारी पोलिसांसोबत सोमवारी मध्यरात्री एमएच ३४-८५८० पोलीस वाहनाने ब्रह्मपुरी-नागभीड महामार्गावर गस्तीसाठी निघाले. दरम्यान, ब्रह्मपुरी शहराकडे येणाऱ्या पीबी ११ एए ६१७९ क्रमाकांच्या ट्रकने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर जबर धडक दिली. पोलीस वाहनाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. यामध्ये ठाणेदार मकेश्वर, विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे हे जखमी झाले. दरम्यान, ब्रह्मपुरी येथील प्रशांत डांगे हे पत्नीसह नागभीड शहराकडून येत असताना हा प्रकार दिसला. त्यांनी स्वत:चे वाहन थांबवून जखमींना रूग्णालयात भरती करण्यास मदत केली. गजभिये, परचाके, चहांदे हे तिघे ब्रह्मपुरीतील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, ठाणेदार मकेश्वर यांना गंभीर दुखापत झाल्याने नागपुरात हलविण्यात आले.
ट्रक चालक सतपालसिंग शेरसिंग डोचक रा. सालेमपूर याच्यावर भादंवि ७९, ३३७, ३३८ व ४१७ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
 


Web Title: Three policemen injured along with the Thane driver in the accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.