खासगी ट्रॅव्हल्सधारकांना तीन महिन्यांचा अल्टीमेटम
By Admin | Updated: July 5, 2017 01:02 IST2017-07-05T01:02:16+5:302017-07-05T01:02:16+5:30
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही.

खासगी ट्रॅव्हल्सधारकांना तीन महिन्यांचा अल्टीमेटम
पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधा : मनपा आयुक्तांनी बजावली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. या समस्येवर अद्यापही मात करता आलेली नाही. शहरातून विविध मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी पार्किंगसाठी रेल्वे उड्डाण पुलाजवळील कृषी कार्यालयालगतची शासकीय जागा बळकावून येथे वाहने उभे करतात. यामुळे प्रवाश्यांची येथे नेहमीच गर्दी असते. प्रवासी नेण्यावरून येथे अनेकदा वादही उद्भवले आहेत. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्स मालकांना पार्किंगसाठी स्वत:ची जागा शोधण्याची नोटीस बजावली आहे. यासाठी तीन महिन्यांचा अल्टीमेटम देण्यात आला असून जोपर्यंत स्वत:ची जागा शोधणार नाही, तोपर्यंत प्रती वाहन २०० रूपये भाडे आकारण्याची कार्यवाही ट्रॅव्हल्सधारकांवर करण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहरातून विविध मार्गावर डझनभरच्या वर खासगी ट्रॅव्हल्स धावतात. मात्र एकाही ट्रॅव्हल्सधारकाकडे पार्किंगसाठी स्वत:ची जागा नाही. त्यामुळे नागपूरसाठी धावणारे ट्रॅव्हल्स वरोरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलालगतच्या कृषी अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभे करतात. तर गडचिरोली मार्गावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला वाहने ठेवतात. येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. समोरच वाहतूक शाखेचे कार्यालय असतानाही प्रवासी नेण्याच्या कारणावरून अनेकदा चालकांमध्ये वादही झालेत. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचून पोलीस तक्रारही करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. ही समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, मनपा आयुक्त संजय काकडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेनंतर खासगी ट्रॅव्हल्स मालकांना जागा शोधण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे.
मनपाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असून एकमेकांकडे बोट दाखवत कारवाई टाळण्याचे काम आजपर्यंत झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या बिकट झाली असून नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
वाहतूक नियंत्रणाच्या जामरचा केवळ २५ वेळा वापर
शहरातील वाहतूक समस्या किती बिकट आहे, याची माहिती असतानाही जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व वाहतूक शाखा दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स् मालक, कार चालकांची मनमानी वाढली असून वाटेल तिथे वाहन पार्किंग केल्याचे शहरात दिसून येते. यातून वाहतूक प्रभावित होत असते. वाहतूक शाखेकडे वाहतूक नियंत्रणासाठी ५ जामर आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत केवळ २५ वेळा या जामरचा उपयोग वाहतूक नियंत्रणासाठी करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमोल पुरी यांनी दिली.