भाजप शहराध्यक्षासह तीन नगरसेवक सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित
By Admin | Updated: February 23, 2015 01:16 IST2015-02-23T01:16:53+5:302015-02-23T01:16:53+5:30
भारतीय जनता पक्षाचे गडचांदूर शहरध्यक्ष सतीश उपलंचीवार यांच्यासह गडचांदूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित तीन नगरसेवकांवर ...

भाजप शहराध्यक्षासह तीन नगरसेवक सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित
राजुरा : भारतीय जनता पक्षाचे गडचांदूर शहरध्यक्ष सतीश उपलंचीवार यांच्यासह गडचांदूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित तीन नगरसेवकांवर पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी भाजप पक्षातून काढून टाकल्याची माहिती राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी रविवारी राजुरा येथे पत्रकार परिषदेत दिली.
नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये आनंदीबाई मोरे, हरिभाऊ मोरे, मधुकर कोहळे यांचा समावेश आहे. गडचांदूर नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून सुचना व आदेश देण्यात आले होते. मात्र शहरध्यक्ष व नगरसेवकांनी पक्षविरोधी कार्यवाही केली. त्यामुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष अतुल देशकर यांच्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे शहराध्यक्ष आणि तीन नगरसेवकांना पुढील सहा वर्षासाठी भारतीय जनता पार्टीतून निष्कासित करण्यात येत असल्याचे व प्राथमिक सदस्यत्त्व रद्द करण्यात आल्याचे पत्र निर्गमीत केले आह. या पत्राची प्रत महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष ना. रावसाहेब दानवे यांनाही पाठविण्यात आले आहे.
आमदार धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, मतदानाच्या दिवशी सकाळी केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व आपल्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर नगरसेवकांना सूचना देण्यात आली होती, मात्र, निवडणुकीच्या वेळी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मदत केली.
ही गंभीर बाब आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांनीही नगरसेवकांना सूचना दिली होती. मात्र आमदाराच्या वीपला न जुमानता नगरसेवकांनी चुकीची कार्यवाही केली, असे आमदार धोटे यांनी सांगितले.
आनंदीबाई मोरे यांनी स्वत: उपाध्यक्ष पदाचा अर्ज भरून सुद्धा स्वत:ला मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. स्वत:ला मतदान न करण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच पाहावयास मिळाला असून पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या तीन नगरसेवक आणि शहरध्यक्षांना निलंबीत करण्यात येत असल्याचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला अरुण मस्की, सतीश धोटे, शिवाजी सेलोकर, बादल बेले, राजेंद्र डोहे, सचिन डोहे, रोशन कारुडे, रूपेश पोतनुरवार, धीरज शर्मा, रामचंद्र पोटदुखे, वामन तुरानकर, सचिन गुरुनुले, अमित जयपूरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)