चंद्रपुरात ब्राउन शुगरपाठोपाठ अमरावतीतील तीन गांजा तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:18+5:302021-03-13T04:52:18+5:30
चंद्रपूर : नागपूर येथून चंद्रपूर येथे ब्राउन शुगरचा पुरवठा करणाऱ्या नागपूर येथील एका महिलेला अटक करण्याची घटना ताजी असतानाच, ...

चंद्रपुरात ब्राउन शुगरपाठोपाठ अमरावतीतील तीन गांजा तस्करांना अटक
चंद्रपूर : नागपूर येथून चंद्रपूर येथे ब्राउन शुगरचा पुरवठा करणाऱ्या नागपूर येथील एका महिलेला अटक करण्याची घटना ताजी असतानाच, अमरावती येथून चंद्रपूर येथे गांजा तस्करी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. यावेळी ६ किलो २४० ग्रॉम ओलसर गांजा व दुचाकी असा १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोलू उर्फ नीलेश ब्रिजलाल शाहू (२८) रा. रतनगंज अमरावती, आसीफ शेख शेख मुज्जु (४५) रा.सादनगर अमरावती व शेख हारुण शेख मोहमद (५२) रा. बगड खिडकी, चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
मागील आठवडाभरात चंद्रपूर शहरात ब्राउन शुगर जप्त करून तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, अमरावती येथून गांजाची चंद्रपुरात तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर रोडवर सापळा रचून एका बजाज मोटारसायकलला थांबवून तपासणी केली. वाहनाच्या डिक्कीत एका प्लास्टीकमध्ये ६ किलो २४० ग्रॅम उग्रवास असलेला ओला गांजा आढळून आला. पोलिसांनी सर्व गांजा व वाहन असा एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली. तिघांवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, नितीन जाधव, राजेंद्र खनके, महेंद्र भुजाडे, जमीरखान पठाण, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, संदीप मुळे, अमोल धंदरे आदींनी केली.