धास्तावलेल्या व्यापार्यांनी कार्बाईड फेकले उघड्यावर
By Admin | Updated: May 30, 2014 23:34 IST2014-05-30T23:34:18+5:302014-05-30T23:34:18+5:30
अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी आंबा विक्रेत्यांच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर आंब्याचे ठोक विक्रेते धास्तावले आहेत. कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविलेल्या आंब्यांच्या

धास्तावलेल्या व्यापार्यांनी कार्बाईड फेकले उघड्यावर
आंब्याच्या बाजारात शुकशुकाट : कारवाईनंतर आंब्याच्या विक्रीत घट
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी आंबा विक्रेत्यांच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर आंब्याचे ठोक विक्रेते धास्तावले आहेत. कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविलेल्या आंब्यांच्या साठय़ावर पुन्हा धाड पडण्याच्या भीतीने अनेक व्यापार्यांनी साठविलेल्या मालाची काल रात्रीतच परस्पर विल्हेवाट लावली. एवढेच नाही तर, कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्याही बाजार समितीच्या आवारातच उघड्यावर फेकून दिल्या. त्या आज शुक्रवारी दिवसभर कचर्याच्या ढिगात पडून होत्या.
आंबे जप्त केल्याचे वृत्त आज वृत्तपत्रातून प्रकाशित होताच ग्राहकांमध्येही खळबळ माजली. त्याचा परिणाम आंब्याच्या विक्रीवर झाला. बाजार समितीमधील ठोक बाजारात आज आंबे नेण्यासाठी घाऊक व्यापार्यांची वाहनेच आली नाहीत. किरकोळ व्यापार्यांनीही अल्प खरेदी केली. आंब्याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो याची कल्पना आल्याने ठोक व्यापार्यांनी मालाची ऑर्डर रद्द केली. परिणामत: आंब्याची आवक मंदावली.
शुक्रवारी दुपारी एरवी गजबजलेल्या बाजार समितीच्या ठोक आंबा बाजारात शुकशुकाट जाणवला. पुन्हा धाड पडण्याच्या शक्यतेने अनेक व्यापार्यांनी तर दुकानेच उघडली नव्हती. काहींनी दुपारनंतर बंद केली. काही दुकाने सुरू असली तरी खरेदीदार मात्र फिरकले नाहीत.
चंद्रपुरात फळांचे जवळपास १३ होलसेलर्स आहेत. आंध्रप्रदेशातील बड्या व्यापार्यांच्या माध्यमातून ही खरेदी होते. आंध्र प्रदेशातील जगत्याल येथून चंद्रपुरात दिवसाला सरासरी ४0 टन आंबे येतात. त्यातून दिवसाकाठी सरासरी ६0 लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र आज व्यापार्यांचा गल्ला रिकामा होता.