वटवाघळांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: February 25, 2015 01:20 IST2015-02-25T01:20:18+5:302015-02-25T01:20:18+5:30
रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल.

वटवाघळांचे अस्तित्व धोक्यात
खडसंगी : रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. हे होवू नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.
वटवाघूळ हा सस्तन पक्षी असून वन विभागाच्या शेड्यूल पाचमध्ये समाविष्ट आहे. वटवाघुळ निशाचर वृत्तीचा पक्षी आहे. रात्रीच्या वेळी किटक, डास, किडे, मुंगी, पाल, लहान आकाराचे साप, विंचू आणि लहान आकाराचे उंदीर खावून पोट भरणे व दिवसा सूर्य प्रकाशापासून दूर जावून थंड ठिकाणी गुहा, झाडाच्या फांदीला लोंबकळत निद्रा घेणे अशा प्रकारे दिवस व रात्रीची दिनचर्या असणाऱ्या उदर गटातील हा प्राणी होय. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या उंच इमारती, वृक्षतोड, उंच इमारतीवरील चमकणाऱ्या काचा आदी कारणांनी वटवाघुळाचे स्थलांतर होतांना त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.
वटवाघळांची कमी झालेली संख्या हेच किटक वाढीचे मुख्य कारण आहे. कारण रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणवर किटक खाण्याचे काम वटवाघुळे करतात. एका रात्री साधारणपणे एक वटवाघुळ दीड ते दोन हजार डास फस्त करते. पूर्वीच्या काही गावांच्या बाहेर पिपड, वड आदी मोठ्या झाडाखाली वटवाघुळे असत. सध्या मात्र झाडे व वटवाघुळे सुद्धा दिसत नाहीत. वटवाघुळ व घुबड यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये निसर्गसाखळी वाचवण्यासाठी त्याची गरज आहे. वृक्ष न तोडता त्याचे पुर्नरोपन करावे व वटवाघुळाची शिकार करु नये, असे नियम करावेत. त्यामुळे वटवाघुळाचे अस्तित्व टिकून राहील. (वार्ताहर)