हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: April 23, 2015 01:04 IST2015-04-23T01:04:48+5:302015-04-23T01:04:48+5:30
जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
वतन लोणे घोडपेठ
जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. मात्र या प्रकल्पाच्या मान्यतेनंतरही परिसरातील अनेक सुशिक्षीत तरूण बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांचे या आस्थापनेत काम करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न भंगले आहे.
ताडाळी एमआयडीसी येथे ६०० मेगावॅट उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरूणांचे भविष्य प्रकल्पाच्या निमीत्त्याने टांगणीला लागले आहे.
सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी संबोधली जाते. बरेचशे उद्योग या एमआयडीसी मध्ये स्थापन झाले आहेत. मात्र बऱ्याच उद्योगांना अखेरची घरघर लागल्याने या परिसरातील कामगार तसेच मजुरांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
ताडाळी येथील उर्जानिमीर्ती प्रकल्पाचे बांधकाम मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे.
ताडाळी व परिसरातील नागरिकांची ५०० एकर जमिन या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे एकमात्र साधन उद्योगाच्या स्वरूपात हिरावल्यामुळे तसेच उद्योग अजुनपर्यंत सुरू न झाल्यामुळे जगायचे कसे, या विवंचनेत ताडाळी परिसरातील शेतकरी व मजुरवर्ग सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
आस्थापनेला मराठी तरूणांची अॅलर्जी
प्रत्येक आस्थापनेमध्ये ८० टक्के जिल्ह्यातील कामगारांना रोजगार द्यावा, असा शासनाचा नियम आहे. मात्र धारीवाल आस्थापनेमध्ये या नियमाला बगल देवून बऱ्याचशा लहानमोठ्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या राज्यातील मजुरांना काम दिले जाते. त्यामुळे मराठी तरूणांना काम मिळत नसून जिल्ह्यातील तरूणांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच कामगारांना १५ दिवसांचे काम कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. कुटूंब कसे चालवायचे, या विवंचनेत कामगार वर्ग सापडला आहे.
नोकरीवरून काढण्याचा सपाटा
ताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक या पदावर बरेच मराठी तरूण कंत्राटी पध्दतीने मागील पाच-सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र धारीवाल प्रशासनाला मराठी तरूणांची अॅलर्जी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोणत्याही लहान-मोठ्या कारणांवरून सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढण्याचा पर्याय कंपनीकडून स्वीकारला जात आहे. कंपनीचे उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी हे सुरक्षारक्षकांची पिळवणुक करीत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.
सुरक्षा रक्षकांचा न्यायासाठी संप
शुक्रवारी धारीवाल आस्थापनेतील सुरक्षा रक्षकांकडून संप पुकारण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी न घेतलेल्या आगाऊ रकमेची पगारातून कपात करण्यात आली होती. मात्र संपाचा बडगा उगारल्यामुळे धारीवाल प्रशासनाने सर्व सुरक्षारक्षकांचे कपात केलेले वेतन परत करण्याचे मान्य केले. तसेच काहीच कारण नसतांना आत्तापर्यंत निलंबीत केलेल्या सुरक्षारक्षकांवर भाष्य करण्यास कंपनी प्रशासनाने नकार दिला आहे. सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.