पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: November 12, 2014 22:41 IST2014-11-12T22:41:57+5:302014-11-12T22:41:57+5:30
तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे

पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
चंद्रपूर : तुकूममधील ताडोबा मार्गावरील मुख्य रस्त्याखालून शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तीन ते चार ठिकाणी फूटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. पाईपलाईन त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी इको-प्राने महानगरपालिका आयुक्तांना केली आहे. मात्र मागणीकडे प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.
तुकूम- दुर्गापूर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून ते मातोश्री विद्यालयापर्यंत इरई धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेली भूमिगत पाईपलाईन ठिकठिकाणी फूटली आहे. हा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांना पाणी पुरवठा कमी झालेला आहे. तसेच पाण्याच्या गळतीमुळे रस्त्याचा काही भागसुद्धा खराब झाला आहे. याबाबत ७ एप्रिलला इको-प्रोच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. सोबतच तुकूम- दुर्गापूर रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून मोठ-मोठे सिमेंटचे पाईप पडलेले आहेत. त्यामुळे मोटारसायकल, कार पार्किगच्या जागेवर पाईपचे अतिक्रमण झाल्याने सायंकाळच्या वेळी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत
आहे. सदर पाईप हटविणेसुद्धा गरजेचे आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष केंद्रीय करुन पाणी गळती सुरु असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात राहुल विरुटकर, राहुल कुचनकर, शशांक मुंजनकर, विजय हेडाऊ, आशिष कामटकर, स्वप्निल शिंदे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)