हजारो अनुयायांनी फुलला परिसर
By Admin | Updated: October 16, 2014 23:22 IST2014-10-16T23:22:45+5:302014-10-16T23:22:45+5:30
५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत १५ आॅक्टोबरला येथे ५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला.

हजारो अनुयायांनी फुलला परिसर
चंद्रपूर : ५६ वर्षांपूर्वी येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या ऐतिसासिक दीक्षांत समारोहाच्या चिरंतन आठवणींना उजाळा देत १५ आॅक्टोबरला येथे ५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. शोषित पिडीत, दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी चंद्रपुरात दाखल अन् संपूर्ण दीक्षाभूमी परिसर जयभीमच्या गजराने फुलून गेला.
१६ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना तथागतांच्या बुद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार हे बौद्ध धम्माचा पूर्नरूज्जीवनाच्या क्रांतीकार्याचे पहिले पाऊल होते. ही जगातील अद्भूत व ऐतिहासिक घटना चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती सतत होत राहावी, यासाठी दरवर्षी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरच्यावतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आयोजीत केला जातो. काल १५ आॅक्टोबर बुधवारी विश्वशांती व विश्वबंधुत्व वाहन रॅलीने महोत्सवाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण व सामुहिक बुद्ध वंदनेनंतर भव्य वाहन रॅलीचे जटपूरा गेट मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातून वरोरा नाका मार्गाने दीक्षाभूमीवर प्रस्थान झाले. त्यानंतर वाहन रॅली दीक्षाभूमीवर पोहचली.
समारंभाचे अध्यक्ष अरुण घोटकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण तसेच श्रद्धेय भदन्त सदानंद महाथेरो केळझर यांचे हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्रद्धेय भदन्त सदानंद महाथेरो केळझर यांनी उपस्थित जनसमूहाला त्रिशरण व पंचशील दिले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त श्रद्धानंद, चंद्रपूर, भन्दत विनय बोधीप्रिय थेरो, घुग्घुस, भदन्त आर्यसुत्त, भदन्त आनंद बल्लारपूर, भदन्त संघवंस मूल, भदन्त ज्ञानज्योती उपस्थित होते. तसेच मेमोरिअल सोसायटीचे सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. मारोतराव खोब्रागडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भदन्त सदानंद महाथेरो यांनी उपस्थित जनसमुहाला संबोधित करताना म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय, सुखमय होण्यासाठी चिताची शुद्धी आवश्यक आहे आणि ही चित्त शुद्धी विपश्यनाद्वारा प्राप्त होते, असे सांगितले. भदन्त पद्माबोधी यांनी, देशात समता, स्वातंत्र व लोकशाही निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले, असे सांगितले. भदन्त कृपाशरण महाथेरो यांनी, बुद्धाचा धम्म माणसांनी माणसावर प्रेम करणे, समानता, बंधुभाव शिकवितो. म्हणून बुद्धाचा धम्म मानवाच्या उत्थानाकरिता आहे, असे सांगितले. भदन्त विनय बोधिप्रिय यांनी, भगवान बुद्धांनी जो परिपूर्ण व परिशुद्ध व विज्ञानवादी धम्म दिला, तो सर्वांनी आचरणात आणला पाहिजे, असे सांगितले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष अशोक घोटेकर यांनी, समारंभाचे महत्त्व विशद केले. बुद्धविहार हे बौद्ध संस्काराचे केंद्र आहे. प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात जाऊन संस्कारमय आधुनिक बौद्धसंस्कृती निर्माण केली पाहिजे, असे सांगितले. संचालन धम्ममित्र शैलेंद्र शेंडे यांनी केले. तर आभार डॉ. विजया गेडाम यांनी मानले. (स्थानिका प्रतिनिधी)