हजारो शेतकरी कामाच्या शोधात
By Admin | Updated: November 20, 2014 22:49 IST2014-11-20T22:49:31+5:302014-11-20T22:49:31+5:30
निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे.

हजारो शेतकरी कामाच्या शोधात
तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्ष
शंकर चव्हाण - जिवती
निसर्गाच्या दरवर्षीच्या वक्रदृष्टीमुळे दुबार तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरत नसल्याने पहाडावरील शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही तो कसा करावा, या विवंचनेत तो अडकला आहे. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. पोटाच्या भ्रांतीसाठी शाळकरी मुलांना सोबत घेऊन कोणी ऊस तोड कामगार म्हणून तर कोणी कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होत असल्याचे चित्र पहाडावर बघायला मिळत आहे.
आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होऊन उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यात त्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतपेडही होत नाही. ही त्यांची करूण कहाणी आहे. देशात शेतकऱ्याला बळीराजा म्हणून ओळखले जाते. मात्र हा बळीराजा नावालाच राजा राहिला आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही पिकत नाही. पिकले तरी विकत नाही. निवडणुका आल्या की आश्वासनाचा पिटारा खोलणारे राजकीय मंडळी आम्हीच त्यांचे कैवारी असल्याचा दावा करतात व निवडणुका संपल्या की त्यांच्याकडे पाठ फिरवितात. हा काही नवखा अनुभव नाही. एकीकडे शासन स्तरावरून मागेल त्याला काम, असा रोजगार हमी योजनेचा डंका पिटवीत असले तरी पहाडावरील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी अजूनही सर्वकंश अशी योजना किंवा उपाययोजना सरकारला तयार करता आली नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.