हजारो नागरिकांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प
By Admin | Updated: March 20, 2016 00:54 IST2016-03-20T00:54:54+5:302016-03-20T00:54:54+5:30
स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भद्रावती नगर परिषदेने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.

हजारो नागरिकांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प
भद्रावती : स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावतीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भद्रावती नगर परिषदेने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे, या क्रीडा स्पर्धेला उपस्थित हजारो नागरिकांनी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प केला. यासोबतच राज्यातून तथा विभागातून आलेल्या खेळाडूंचाही यात समावेश होता.
नगर परिषद भद्रावतीद्वारे नागपूर विभागस्तरीय न.प.च्या नगराध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेचे स्थानिक निळकंठ शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. राज्याचे वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, आ. बाळू धानोरकर, खा. विनायक राऊत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्याक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते. मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेच्या सप्तपदीची शपथ दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, इथून याची सुरुवात झाली. माझे पहिले पाऊल सहभागाच्या ठाम निर्धाराचे, दुसरे पाऊल व्यापक लोकसहभाग मिळविण्याचे, तिसरे पाऊल १०० टक्के शौचालयाचाच वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे, चौथे पाऊल कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक करण्याचे, पाचवे पाऊल कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याचे, सहावे पाऊल सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे, सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे असेल, अशा प्रकारच्या स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प हजारो नागरिकांनी घेतला. भद्रावती न.प.च्या स्वच्छतेबाबतच्या सकारात्मक विचाराबाबत हजारो नागरिकांनी आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)