‘त्या’ विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडे नेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:36 IST2016-08-28T00:36:17+5:302016-08-28T00:36:17+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेले स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेद राईकवार व पारितोष भांडेकर हे सातवीतील दोन विद्यार्थी संघर्ष करीत आहेत.

‘त्या’ विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडे नेणार
स्कूल बॅग करा हलके : वडेट्टीवार यांनी केले धाडसाचे कौतुक
चंद्रपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेले स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेद राईकवार व पारितोष भांडेकर हे सातवीतील दोन विद्यार्थी संघर्ष करीत आहेत. या संघर्षाची आ. विजय वडेट्टीवार यांनी दखल घेतली. प्रसारमाध्यमांपुढे येत आपली व्यथा मांडणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक करीत त्यांची शिक्षणमंत्र्यांशी भेट घडवून आणणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऋग्वेद व पारितोष यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत त्यांनी आपली व्यथा मांडताच त्यांच्या विद्या निकेतन शाळेने शाळेतच लॉकरची व्यवस्था केली. मात्र या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग हलक्या करायच्या आहेत. यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आज शनिवारी आ. विजय वडेट्टीवार हे येथील विश्रामगृहात आले असता त्यांनी या दोन विद्यार्थ्यांना तिथे बोलावून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांची मागणी रास्त असून आपणही यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिली. तसेच लवकरच या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्याशी भेट घालून देणार, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्रालयाने यापूर्वीच स्कूल बॅगचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. आम्हाला आता आश्वासन नको, या दृष्टीने ठळक निर्णय हवा, असेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. (नगर प्रतिनिधी)