‘त्या’ वृद्धांना आता स्वगृही परतण्याची आस !
By Admin | Updated: February 4, 2015 23:11 IST2015-02-04T23:11:24+5:302015-02-04T23:11:24+5:30
पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’

‘त्या’ वृद्धांना आता स्वगृही परतण्याची आस !
रुपेश कोकावार - बाबूपेठ (चंद्रपूर)
पोटच्या गोळ्यांनी बेघर केलेल्या असाह्य आई-वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षाची व्यथा ‘लोकमत’ने ‘पोटच्या गोळ्यांनी नाकारलेल्यांच्या हाती आले भिक्षापात्र’ या वृत्तातून मांडली. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महाकाली परिसरात जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या वृद्धांना घरी परतण्याची आस लागली आहे.
बुधवारी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी महाकाली परिसरातील वृद्धांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांची आपबिती ऐकून बेजबाबदार मुलांना नोटीस बजावण्याची तयारी दर्शवली. ज्या मुलांना लहाण्याचे मोठे केले, खांद्यावरती बसवून जग दाखवले, त्याच पोटच्या पोराने जीवनातील शेवटच्या वळणावर पोरख केले. अन् स्वत:च्या हक्काच्या घरुनही हाकलून देत बेघर केले. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी डोक्यावर छत शोधत अनेक वृद्धांनी महाकाली मंदिराचा आसरा घेतला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या हातात भिक्षापात्रही आले. मिळेल ते खाऊन जीवन जगण्यासाठी सुरु असलेली संघर्षमय व्यथा ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केली.
या बातमीची दलख घेत महाकाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी ‘त्या’ पीडित वृद्धांची भेट घेवून त्यांच्यावर आलेल्या या दशेमागचे सत्य जाणून घेतले. आई-वडीलांवर अशी वेळ आणणाऱ्या मुलांना नोटीस पाठवण्यात येणार असून ‘तुम्हचे आई-वडील मंदिर परिसरात असून, त्यांना घरी नेण्यात यावे’ अन्यथा पुढील कार्यवाहीस तुम्ही पात्र राहाल, असे नमूद करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांमुळे आता आपण पुन्हा आपल्या हक्काच्या घरात परतणार, अशी ‘त्या’ वृद्धांना आस लागली आहे.