‘त्या’ ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती
By Admin | Updated: August 28, 2016 00:34 IST2016-08-28T00:34:59+5:302016-08-28T00:34:59+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे.

‘त्या’ ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती
दोघांचे अर्ज : नवीन आदेशामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा, एसटी महामंडळाचा निर्णय
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याकरिता दोन कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रकांकडे अर्ज सादर केला आहे. ३५ पैकी तब्बल २५ कर्मचारी तिकिटांच्या अपहारप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यापैकी कोणत्याही वाहकाने पुनर्नियुक्तीसाठी अर्ज सादर केलेला नाही. त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई येथील कार्यालयात एस.टी.च्या संचालक मंडळाची १ एप्रिल २०१६ रोजी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांकरिता कुटुंब सुरक्षा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ठरावानुसार, ६ आॅगस्ट २०१६ रोजी तीन परिपत्रक काढण्यात आले आहेत. त्यामध्ये परिपत्रक क्रमांक २३ मध्ये गैरहजेरीमध्ये बडतर्फ करणाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत अटी व निकष देण्यात आले आहेत. परिपत्रक क्र. २४ मध्ये प्रलंबित अपराध प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर परिपत्रक क्र. २५ मध्ये अपहारप्रकरणी बडतर्फ झालेल्या बाहकांना पुनर्नियुक्ती देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गैरहजेरीप्रकरणी बडतर्फ कर्मचाऱ्याचे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास ते प्रकरण न्यायालयातूून मागे घेण्याच्या अधीन राहून व त्याची मागील देयक रक्कम अदा केल्यानंतरच त्या कर्मचाऱ्यास पुनर्नियुक्ती दिली जाणार आहे. वाहकांनी तिकिटांची पुनर्विक्री करणे, कमी दराचे तिकीट देणे, विनानिधी सामान वाहून नेणे, प्रवास भाडे वसूल करूनही तिकीट न देणे अशा विविध प्रकरणी तडजोडीच्या कार्यवाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तिकिटांच्या अपहरप्रकरणी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देताना प्रकरण कामगार अथवा अन्य न्यायालयात प्रलंबित असल्यास त्यांना मागील सेवेचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. (प्रतिनिधी)
गैरहजेरीप्रकरणी दोन अर्ज
परिपत्रक क्रमांक २३ मध्ये कार्यालयात सतत गैरहजर राहिल्याने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती दिली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात १० कर्मचारी विविध कार्यालयांमध्ये सतत गैरहजर राहिल्याचे प्रकरण सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रक के. एम. सहारे यांच्याकडे पुनर्नियुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये चंद्रपूर डेपोचे कर्मचारी अजय साखरकर आणि राजुरा डेपोच्या कर्मचारी निकीता वानखेडे यांचा समावेश आहे.
अपहार करणाऱ्या वाहकांचा अर्ज नाही
चंद्रपूर विभागात तब्बल २५ वाहकांना अपहारप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. त्यापैकी कोणत्याही वाहकाने पुनर्नियुक्ती मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही. न्यायालयात प्रकरण सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत लेखी तडजोडनामा न्यायालयात सादर करून न्यायालयीन प्रकरण मागे घेण्याची अट टाकण्यात आली आहे.
कुटुंबाची कुचंबना थांबविण्यासाठी पुनर्नियुक्ती
एस.टी. चे अनेक कर्मचारी केलेल्या अपराधामुळे बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर विभागात ३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर त्यांच्या कुटुंबांची आर्थिक कुचंबना होते. ज्या कर्मचाऱ्याचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक झालेले नाही, त्या कर्मचाऱ्यांना कुटुंब सुरक्षा योजनेअंतर्गत अटी व शर्तींच्या अधीन राहून पुनर्नियुक्ती दिली जात आहे.
बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा विचार करून कुटुंब सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. बडतर्फ कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्ती देताना संबंधित कर्मचाऱ्याच्या पदातील त्याच्या विभागातील सामाजिक आरक्षणानुसार व सध्या असलेल्या रिक्त पदांनुसार नियुक्ती दिली जाणार आहे. त्याची माहिती विभागांच्या व आगारांच्या सूचना फलकावर लावण्यात देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ बडतर्फ कर्मचाऱ्यांनी घ्यावा.
- के. एम. सहारे,
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर विभाग.