परंपरेला फाटा देऊन तेरवीला प्रबोधनपर कार्यक्रम
By Admin | Updated: August 22, 2016 01:56 IST2016-08-22T01:56:04+5:302016-08-22T01:56:04+5:30
तेरवीतील कर्मकांड आदींना फाटा देत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन विसापूर येथील पंदिलवार परिवाराने समाजाला नवीन दिशा दाखविली आहे.

परंपरेला फाटा देऊन तेरवीला प्रबोधनपर कार्यक्रम
बल्लारपूर : तेरवीतील कर्मकांड आदींना फाटा देत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन विसापूर येथील पंदिलवार परिवाराने समाजाला नवीन दिशा दाखविली आहे.
विसापूर येथील सुरेश पंदिलवार यांची आई बहिणाबाई यांच्या निधनानंतर त्यांनी तेरवीचा पारंपारिक कार्यक्रम न करता विसापूर येथे प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला. सदर कार्यक्रम पंढरीनाथ देवस्थानात पार पडला. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंकी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना प्रबोधन करताना सोळंकी म्हणाले, देव मानू नये असे आमचे म्हणणे नाही, श्रद्धा जरूर असावी. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या अनेकांची लूट होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रकार थांबणे आवश्यक आहे. जुन्या चालीरिती, परंपरा नष्ट करुन, विज्ञानाची कास धरा. त्याद्वारेच प्रगती होऊ शकते, असे परिवर्तनशील विचार त्यांनी मांडले. यावेळी सदाशिव कुदरपवार, रमेश व सुरेश पंदिलवार यांनीही आपले मनोगत मांडले. प्रास्ताविक मुन्नालाल पुंडे, संचालन व आभार प्रदर्शन अरविंद जनपल्लीवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)