धार्मिक स्थळांवर राहणार तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’
By Admin | Updated: March 28, 2015 01:01 IST2015-03-28T01:01:25+5:302015-03-28T01:01:25+5:30
गुन्हेगारीवर आळा घालने सोईस्कर व्हावे याकरिता शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळांवर राहणार तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’
वरोरा : गुन्हेगारीवर आळा घालने सोईस्कर व्हावे याकरिता शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यातच धार्मिक स्थळांनाही अलीकडेच चोरट्यांनी लक्ष केले आहे. त्यामुळे आता धार्मिक स्थळामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता धार्मिक स्थळांच्या पंच कमेटीला जिल्हा प्रशासनाने पत्र दिले आहे. त्यामुळे आता प्रत्येक धार्मिक स्थळावर तिसऱ्या डोळ्याच्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
शहरातील गजबजलेल्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या चौकात, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता प्रशासन सरसावले आहे. बँकेमध्ये यापूर्वीच कॅमेरे लागले असल्याने बँक ग्राहकांची बँकेतील लुबाडणुक काही अंशी कमी झाल्याचे दिसते.
ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे, अशा ठिकाणी चोरटे चोरीस धजावत नसल्याचा प्रशासनाचा अनुभव आला आहे. मात्र मागील काही वर्षात धार्मिक स्थळामध्ये उत्सवादरम्यान महिलांचे दागीने तर पुरुषांचे पॉकीट पळविणे अशा घटना चोरट्यांकडून घडल्या. रात्री व दुपारी सामसुम असताना धार्मिक स्थळावर चोरट्याची नजर आहे. रात्रीच्या वेळी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी जावून आपला हात साफ करीत असल्याने त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने धार्मिक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता संबंधित कमेटीला आव्हान करत पत्र दिले आहे. धार्मिक स्थळाच्या समित्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.(तालुका प्रतिनिधी)