चिमुरात तिसऱ्या दिवशीही मनसेची गांधीगिरी सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:46 IST2016-08-25T00:46:34+5:302016-08-25T00:46:34+5:30
तालुक्यातील जनसामान्याच्या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी व चैती तुकूम येथील अवैध ...

चिमुरात तिसऱ्या दिवशीही मनसेची गांधीगिरी सुरुच
आमरण उपोषण: प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा फिस्कटली
चिमूर : तालुक्यातील जनसामान्याच्या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी व चैती तुकूम येथील अवैध उत्खनास सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी मनसेने प्रशासकीय भवनासमोर सोमवारपासून गांधीगिरी आंदोलन सुरु केले. दरम्यान मंगळवारी तहसीलदार संतोष महल्ले व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी सायंकाळी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्ता सोबत व मनसे तालुकाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्यांशी मागण्याबाबत चर्चा करुन उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणकर्त्याचे समाधान न झाल्याने प्रशासकीय अधिकारी व उपोषणकर्ता मधील चर्चा फिस्कटल्याने बुधवारी तिसऱ्या दिवशीही मनसेची गांधीगिरी सुरुच आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चैती तुकूम येथील अवैध उत्खनन करुन रॉयल ब्लू रिसोर्टन बांधकाम केले. यामध्ये शासनाचा महसूल बुडाला. याबाबत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, ले-आऊट धारकांनी नियमाचा भंग करुन ओपन स्पेसची विक्री केली. बोगस अंत्योदय, बीपीएल कार्ड रद्द करावे, महसूल विभागातील फेरफार वेळेत करण्यात यावे, संजय गांधी योजनेच्या मानधनात वाढ करण्यात यावी, यासह जनसामान्यांच्या मागण्या घेवून मनसेने सोमवारपासून आमरण व साखळी उपोषण सुरु केले आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारला सायंकाळी चिमूरचे तहसीलदार संतोष महल्ले व नगगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी उपोषण मंडपास भेट देवून उपोषणकर्ताशी त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे प्रशासनातर्फे सांगितले. मात्र उपोषण कर्ताचे समाधान न झाल्याने तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच होते.
उपोषणकर्ते महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे यांनी जोपर्यंत अवैध उत्खनन करणारे रॉयल ब्लू रिसोर्टचे संचालक व शासनाचा महसूल बुडवणारे नायब तहसीलदार विनायक मगर यांना जोपर्यंत निलंबीत करुन चौकशी करणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
याच मुद्दयावरील चर्चा फिस्कटल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. सोमवारपासून मनसेचे चिमूर उपाध्यक्ष महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे आमरण उपोषणास बसले आहेत.
तर साखळी उपोषणास मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे व संजय वाकडे बसले आहेत. (प्रतिनिधी)
रिसोर्ट सचालकावर २७ जून २०१६ ला २ लाख १० हजार ७०० रुपयाचा दंड आकारुन वसूल करण्यात आला आहे. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस केली आहे. ले-आऊट बाबत उपविभाीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन कारवाई करण्यात येईल. तथा बोगस बीपीएलधारकांचे नावे दिल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यासह आणखीही मागण्याबाबतचे पत्र आपण उपोषणकर्तास दिले आहे.
- संतोष महल्ले,
तहसीलदार, चिमूर