नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही दाम्पत्यास तिसरे अपत्य
By Admin | Updated: December 31, 2016 02:01 IST2016-12-31T02:01:22+5:302016-12-31T02:01:22+5:30
दोन अपत्य प्राप्तीनंतर शासनाच्या धोरणानुसार शासकीय शिबिरात स्त्रीने नसबंदी शस्त्रक्रिया केली.

नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही दाम्पत्यास तिसरे अपत्य
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत : शासकीय लाभापासून दाम्पत्य राहणार वंचित
वरोरा : दोन अपत्य प्राप्तीनंतर शासनाच्या धोरणानुसार शासकीय शिबिरात स्त्रीने नसबंदी शस्त्रक्रिया केली. मात्र त्यानंतरही दांम्पत्यास तिसरे अपत्य झाले. तिसरे अपत्य होण्यापूर्वी सदर दांम्पत्यांनी आपली कैफीयत शासन दरबारी मांडली. परंतु, उपयोग झाला नाही. आता तिसरे अपत्य झाल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून सदर कुटूंब दोष नसतानाही वंचित राहणार आहे.
वरोरा तालुक्यातील एका गावातील हा प्रकार आहे. रितीरिवाजाप्रमाणे ओमदेव-वनमाला (बदललेले नाव) याचा विवाह झाला. मजुरी करून आपल्या कुटूंबियांचा गाडा हाकत असताना कुटूंबामध्ये एक मुलगा व एक मुलगी जन्माला आल्याने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया त्या स्त्रीने शासकीय शिबिरात करून घेतली. ‘हम दो, हमारे दो’ प्रमाणे कुटूंब मजुरी करून अत्यंत आनंदाने जीवन जगत होते. मात्र कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या स्त्रीला काही दिवसांपूर्वी गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे दाखले घेवून शासकीय रुग्णालय गाठले व आपली आपबित्ती कथन केली.
परंतु गरीब कुटूंबाच्या वेदनेकडे शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना बघण्याची उसंत मिळाली नाही. उंबरठे झिजवीत असताना ‘त्या’ मातेने तिसऱ्या अपत्यास जन्म दिला, याची शासकीय दप्तरामध्ये नोंद करण्यात आली. गरीब कुटूंबियाची कुठलीही चूक नसताना शस्त्रक्रियेच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने या कुटूंबियास आता त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेत असताना किती अपत्य आहे, याची विचारणा केली जाते. तिसरे अपत्य असल्यास शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही, ते दुर्दैव आता ‘त्या’ कुटूंबाच्या आड येत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)