खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही अटक
By Admin | Updated: March 26, 2017 00:29 IST2017-03-26T00:29:51+5:302017-03-26T00:29:51+5:30
चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उरकूडपार गावाशेजारी एका प्रेमप्रकरणातून मनोज जुमनाके यांचा कट रचून २५ डिसेंबर २०१६ रोजी खून करण्यात आला.

खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही अटक
चिमूर पोलिसांच्या सायबर शाखेची कारवाई
चिमूर : चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उरकूडपार गावाशेजारी एका प्रेमप्रकरणातून मनोज जुमनाके यांचा कट रचून २५ डिसेंबर २०१६ रोजी खून करण्यात आला. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात चिमूर पोलिसांना यश आले होते. मात्र या खुनातील तिसरा आरोपी शाबीर मोहम्मद रसुल शेख (३३) फरार होता. चिमूर पोलिसांची टीम या तिसऱ्या आरोपीचा कसून शोध घेत होती. अखेर सायबर शाखा चंद्रपूरच्या मार्फतीने ‘कॅफ’ने या खुनातील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून २० मार्च २०१७ ला नाहरगड (राजस्थान) येथून अटक केली आहे.
चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उरकुडपार येथील रहिवासी प्रज्ञा संघप्रिय गेडाम व मनोज जुमनाके रा. पिंपळनेरी (पेठ) यांचे प्रेम संबंध होते. यातूनच दोघात वाद झाला. या वादाचे पर्यावसान मनोज जुमनाके यांच्या खुनात झाले. मृत मनोज जुमनाके यांच्या खुनाच्या कटात आरोपी प्रेयसी प्रज्ञा गेडाम, भाऊ सिद्धार्थ बालाजी लोखंडे व तिसरा आरोपी शाबीर शेख यांचा समावेश होता.
मनोज जुमनाके यांना रात्री उरकुडपार येथे बोलावून २५ डिसेंबर २०१७ ला तीनही आरोपींनी मिळून कट रचून मनोजचा खून केला. या कटातील तिसरा आरोपी शाबीर मोहम्मद शेख ३३) रा. नाहरगड ता. कीशनगंज जि. बारा (राजस्थान) याचा काहीच पत्ता नसल्याने या आरोपीचा शोध घेताना चिमूर पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र त्याच्याकडे असलेल्या मोबाईल सीमसाठी जोडण्यात आलेल्या पुराव्यानुसार (कस्टमर अप्लीकेशन फार्म) ‘कॅफ’ वरील माहितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या मदतीने ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोज ताले, देविदास रणदिवे, कुणाल राठोेड या पथकाने राजस्थान गाठून आरोपी शाबीर शेख याला राजस्थान येथून २० मार्चला अटक केली व कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईने चिमूर पोलिसांचे नागरिकांकडून व वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)