प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी ते चढले झाडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:21+5:302021-04-18T04:27:21+5:30
भद्रावती : कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननाच्या कामाला सुरुवात होताच येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी तसेच बरांज गावातून जाणारी ...

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी ते चढले झाडावर
भद्रावती : कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननाच्या कामाला सुरुवात होताच येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी तसेच बरांज गावातून जाणारी कोळशाची वाहतूक बंद करावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी एम्टा कंपनीची वाहतूक रोखली, तर येथील भाजप कार्यकर्ते नरेंद्र जीवतोडे हे तहसील परिसरात झाडावर चढून सहा तास राहिले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
येथील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कंपनीच्या नावाने नियुक्त पत्र देण्यात यावे, तसेच पुनर्वसनाचा मार्ग मार्गी लावावा, कंपनीने कोळसा वाहतूक गावातून बंद करावी, यासाठी कर्नाटक एम्टा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना लेखी पत्र देण्यात आले होते. मात्र, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. यावर शनिवारी प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक रोखली, तर नरेंद्र जीवतोडे हे तहसील कार्यालयसमोरील झाडावर चढून बसले. याबाबत माहिती होताच ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी वाहतूक रोखणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना काही वेळ ठाण्यात बसवून ठेवले. या घटनेची माहिती होताच येथे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, नामदेव डाहूले, तहसीलदार महेश शितोडे, ठाणेदार सुनीलसिंग पवार, प्रवीण ठेवणे, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे हे देखील तिथे उपस्थित झाले. अधिकारी वासाडे यांच्यासोबत चर्चा झाली; परंतु हा निर्णय कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार केपीसीएल कंपनीचे कोळसा उत्खननाचे काम चालू आहे. एका आठवड्यानंतर कर्नाटक सरकारच्या ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येईल, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले .त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.