गरिबांच्या शिक्षणावर संकट येणार
By Admin | Updated: January 4, 2017 00:53 IST2017-01-04T00:53:18+5:302017-01-04T00:53:18+5:30
गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे.

गरिबांच्या शिक्षणावर संकट येणार
विरा साथीदार : शिक्षणावर जाहीर व्याख्यान
चंद्रपूर : गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे. त्यामुळे येणारा काळ गरिबांच्या शिक्षणाचे मोठे संकट घेवून येणार आहे. भारतीय राज्य घटनेनुसार शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे दिली असताना आता विदेशी कंपन्या आपले शिक्षण ठरवणार असल्याने शिक्षणासाठी मोठे आंदोलन करायची गरज आहे, असे आवाहन ‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी नामांकन झालेला 'कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि विचारवंत विरा साथीदार यांनी केले.
येथील राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात बाबुपेठ येथील दिशा महिला समितीने आयोजित केलेल्या ‘डॉ. बाबासाहब आंबेडकरांना अपक्षित शिक्षण आणि आजची परिस्थिती’ या जाहीर व्याख्यानात साथीदार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार मुकेश वाळके होते. यावेळी प्रमुख पाहुणे विदर्भवादी नेते किशोर पोतनवार, आंबेडकरी आंदोलनाचे प्रा. एस.टी. चिकटे, दिशा महिला समितीच्या ज्योतीताई मेश्राम, महाकुलकर, शाहिदा शेख, असीम मेश्राम आदी उपस्थित होते.
अभिनेते साथीदार म्हणाले, आजचे शिक्षण भांडवलदारांची गरज लक्षात घेऊन दिले जात आहे. त्यामुळे आता हा प्रश्न बेरोजगार, युवक आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की, बाबासाहेबांना अपेक्षित शिक्षण नव्या पिढीला कसे मिळेल?
ते पुढे म्हणाले, कुटुंब संस्थेचा जन्म कसा झाला, हे कळल्याशिवाय सामाजिक समस्यांची उकल होणार नाही. त्यासाठीच समाजवादी जाणिवेची मानवतावादी संवेदना असलेल्या शिक्षणाची खरी गरज आहे. शिक्षणाने सुजाण झालेल्या पिढीशिवाय सामाजिक-आर्थिक समानतेची भाषा बोलणारी चळवळ उभी राहणार नाही. खरं तर शिक्षणाच्या हक्कांची मागणी महात्मा जोतीराव फुले आणि कार्ल मार्क्सच्या कालप्रवाहाएवढी जुनी आहे. कारण जेथे विषमता असते, तेथे आधी शिक्षणच हिरावले जाते. सत्ता कधीच निरपेक्ष नसते. असे साथीदार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. चिकाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा साठी दिशा महिला समितीच्या सर्व सदस्यांनीे अथक परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)