विकासासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार
By Admin | Updated: September 29, 2014 00:43 IST2014-09-29T00:43:33+5:302014-09-29T00:43:33+5:30
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात

विकासासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार
चंद्रपूर : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
रविवारी दुपारी बल्लारपूर शहरातील गांधी चौक परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर शहरात विकासाची मोठी मालिका भाजपाच्या माध्यमातून तयार केली. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर शहरात ग्रामीण रुग्णालय, उपकोषागार कार्यालय, ११ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना, न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा, चार कोटी रुपये किमंतीच्या नाट्यगृहाचे बांधकाम, बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या निर्मीतीचा निर्णय, बल्लारपूर-सास्ती या गावांना जोडणाऱ्या पुलाचे वर्धा नदीवर बांधकाम अशी विविध विकासाची कामे आम्ही जनतेच्या प्रेमाच्या बळावर पूर्णत्वास आणली. विकास प्रक्रियेत कधीही आम्ही राजकारण केले नाही, असे ते म्हणाले.
या सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, छत्तीसगढचे माजी आमदार वीरेंद्र साहू, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, रेणुका दुबे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेटी, धर्मप्रकाश दुबे, मीना चौधरी, अॅड.रणंजय सिंह उपस्थित होते. सभेला पुष्पा डंगोरे, वर्षा सुंचूवार, येलय्या दासरप यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)