हेल्पलाईनवरील १४५ तक्रारींचा होणार निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:59+5:30
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणणे आणि मतदारांच्या निवडणूक संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क व जिल्हा संपर्क केंद्र्र स्थापन करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१९ पर्यंत सदर हेल्पलाइनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच निपटारा केल्या जाणार आहे.

हेल्पलाईनवरील १४५ तक्रारींचा होणार निपटारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणणे आणि मतदारांच्या निवडणूक संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क व जिल्हा संपर्क केंद्र्र स्थापन करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१९ पर्यंत सदर हेल्पलाइनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच निपटारा केल्या जाणार आहे.
चंद्र्रपूर शहरात १९५० हेल्पलाईन व मदत केंद्राचे स्वतंत्र कक्ष जिल्हा नियोजन भवनात स्थापन करण्यात आले. या टोल फ्री हेल्पलाईनवर २४ तास माहिती दिली जाते. नागरिकांना निवडणूक व मतदानासंबंधीची सविस्तर माहिती मिळविता येते. मतदारांच्या विविध शंकांचे समाधान केल्या जाते. मतदान यादीत नाव नोंदवणे, मतदान ओळखपत्र मतदान अर्ज निगडीत सर्व माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपले मतदान कक्ष कुठे याची खात्री करण्यासाठी हेल्पलाईनचा उपयोग होतो. मतदानाच्या दिवशी गोंधळ उडू नये, यासाठी हेल्पलाईनचा वापर करावा. या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधीतांना अधिकृत माहिती मिळवणे सोपे झाले आहे. मतदान यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयी मतदार हेल्पलाइन, मोबाइल अॅप किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येते. नागरिकांनी या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
सोशल मीडियावर ‘इलेक्शन फिव्हर’
वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात एकीकडे ‘व्हायरल फिव्हर’ ची साथ तर दुसरीकडे सहाही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये इलेक्शन फिव्हर चढल्याचे दिसून येत आहे. संभाव्य व घोषित उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर विजयाचे दावे-प्रतिदावे करीत आहेत. काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने फेसबुकवर पेजेस तयार केले आहेत. त्यावर दररोजच्या कार्यक्रमाची व दौऱ्याची इत्यंभूत माहिती टाकत आहे. त्यामुळे या चर्चांना मोठी रंगत आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातही पाहता येतात मतदार याद्या
जिल्ह्यात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाले. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या याद्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर परिषद नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय व मतदान केंद्रांवर पाहता येणार आहे.