आदिवासी जीवनावर वैचारिक लेखन व्हायला हवे
By Admin | Updated: February 15, 2015 00:48 IST2015-02-15T00:48:09+5:302015-02-15T00:48:09+5:30
आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते.

आदिवासी जीवनावर वैचारिक लेखन व्हायला हवे
वसंत खेडेकर बल्लारपूर
आदिवासी व गैरआदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनावर कथा, कादंबरी, काव्य इत्यादी प्रकारात लेखन केले आहे. मात्र, त्यात वैचारिकतेची प्रकर्षाने उणीव दिसून येते. आदिवासी साहित्यातून वैचारिकता प्रकट होणे गरजेचे आहे. यावर सर्व साहित्यीकांनी विचार करावा, असे मत वक्त्यांनी येथे जिल्हा साहित्य संमेलनात मांडले.
दोन दिवसीय साहित्य संमेलन येथील सरदार पटेल महाविद्यालयात सुरू आहे. आज, ‘चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी साहित्य वर्तमान आणि भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात वक्त्यांनी आपले विचार मांडलेत. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यीका उषा किरण आत्राम होत्या. सुनील कुमरे, प्रा. राम वासेकर, प्रा. प्रकाश वट्टी, सुदर्शन दिवटे हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते.
सुनील कुमरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांनी केलेल्या आदिवासी साहित्याची पूर्ण माहिती देत, उल्लेखनीय कादंबरी, काव्यसंग्रह, वैचारिक लेख, नाटक आणि ऐतिहासिक लेखन यांची समिक्षा केली. गैरआदिवासी लेखकांचे यासंदर्भात मोठे योगदान असल्याचे सांगत अॅड. एकनाथराव साळवे, प्रा. सुरेश द्वारशीवार, स्व. दादा देशकर यांच्या कादंबरीचा प्रामुख्याने उल्लेख केला. आदिवासी साहित्यीक हा केवळ लेखनापर्यंतच मर्यादित न राहता, त्यांनी आदिवासी चळवळीत सक्रीय भाग घ्यावा, असे आवाहनही केले.
प्रा. राम वासेकर यांनी, आदिवासी साहित्यात आदिवासींचा हुंकार प्रगट व्हायला हवा. तसा तो दिसत नाही. तरीही डॉ. विनायक तुमराम, राजगडकर यांचे याबाबतचे कार्य उल्लेखनीय आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या जाणिवा जगासमोर येण्याकरीता वस्तुस्थितीवर लिहिण्याकरीता तरुण लेखकांनी पुढे यावे, असे म्हणाले.
आदिवासी साहित्य लिखीत आणि अलिखीत अशा दोन स्वरुपात आहे असे, सांगत प्रा. प्रकाश वट्टी यांनी आदिवासींना मोठा इतिहास आहे. ते या प्रांतावर सत्ता गाजवून गेले आहे. त्यांचे कार्य साहित्यातून उमटवावे असे मत मांंडले. सुदर्शन दिवटे यांनी आदिवासींवरील कादंबरी प्रकार यावर प्रकाश टाकला. आदिवासींवर बऱ्याच कांबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. मात्र वैचारिकतेचा त्यात अभाव दिसून येतो. अॅड. साळवे यांची ‘एनकाऊंटर’ ही कादंबरी उजवी आहे. या कादंबरीत घटनांसोबत वैचारिक पातळी आहे, असे सांगितले.