ढगात पाणी नाही, तारेत करंट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:27+5:302021-07-20T04:20:27+5:30
बाबुराव बोंडे तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यात पावसाची वाट बघता बघता धान पऱ्हे करपू लागले. काही अंतरावर वर्धा नदीचे पात्र ...

ढगात पाणी नाही, तारेत करंट नाही
बाबुराव बोंडे
तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यात पावसाची वाट बघता बघता धान पऱ्हे करपू लागले. काही अंतरावर वर्धा नदीचे पात्र वाहत आहे. मात्र नदीचे पाणी मोटारपंपाने शेतात टाकतो म्हणायला विद्युत करंट नाही. ही बिकट स्थिती ओढावली आहे, पोडसा येथील शेतकऱ्यांवर.
नवीन ट्रान्सफार्म लावून द्या, ही मागणी घेऊन शेतकऱ्यांचा चकरा महावितरणचा कार्यालयात सुरू आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची हाक ऐकू गेलेली नाही. गोंडपिपरी तालुक्याचा शेवटचा टोकावर असलेल्या पोडसा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पऱ्हे करपू लागले आहे. पावसाची वाट आतूरतेने शेतकरी बघत आहेत. मात्र पाऊस हुलकावणी देत आहे. दुसरीकडे अवघ्या काही अंतरावर वर्धा नदीचे पात्र आहे. मात्र वर्धा नदीतील पाणी मोटारपंपाने शेतात आणायचे कसे? विद्युत पुरवठा नाही. साईनाथ येलमुले, हरिश्चंद्र येलमुले, पत्रू येलमुले या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत स्तरावर शेतात विद्युत लाईन घेतली. मात्र या तीनही शेतकऱ्यांचा शेतात असलेले विद्युत ट्रान्सफार्मर जळाले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित आहे. नवीन ट्रान्सफार्मर जोडून द्या, अशी मागणी घेऊन तीन महिन्यांपासून शेतकरी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र शेतकऱ्यांची आर्त हाक अधिकाऱ्यांच्या कानावर अद्यापही पोहोचली नाही. परिणामी शेतातील सिंचन व्यवस्था ठप्प पडली आहे.
कोट
सद्यस्थितीत शेतात धान पऱ्हे, कपाशी, मिरची पीक लावले आहेत. महिनाभरापासून पावसाची हुलकावणी सुरू आहे. त्यात ट्रान्सफार्मरही जळले. शेतीचे सिंचन बंद आहे. ट्रान्सफार्मरसाठी तीन महिन्यांपासून चकरा सुरू आहेत. मात्र महावितरणने अद्यापही ट्रान्सफार्मर लावून दिलेले नाही.
- साईनाथ येलमुले, शेतकरी पोडसा