तालुका निर्मितीपासून सिंदेवाहीत अग्निशामक दल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:51+5:302021-01-17T04:24:51+5:30
सिंदेवाही : तालुक्यात धानाचे मोठे गोडाऊन आहेत. अनेक वस्तूंची साठवणूक केली जाते. तालुक्यात बऱ्याचदा आगीच्या घटना घडत आहेत. परंतु ...

तालुका निर्मितीपासून सिंदेवाहीत अग्निशामक दल नाही
सिंदेवाही : तालुक्यात धानाचे मोठे गोडाऊन आहेत. अनेक वस्तूंची साठवणूक केली जाते. तालुक्यात बऱ्याचदा आगीच्या घटना घडत आहेत. परंतु तालुक्यात आगीची घटना घडल्यास वेळेवर अग्निशामक दल पोहोचत नसल्याने तालुक्यातील सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. तालुक्याची निर्मिती होऊन तीन दशकांचा कालावधी लोटला आहे, परंतु आजही तालुका अग्निशामक दल स्थापन करण्यात आले नाही.
धान्य खरेदी केल्यावर वनविकास महामंडळ, सरकारी राईस मिल, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे मोठे गोडाऊन आहेत. तालुक्यातील हजारो टन धान्य रेशनच्या गोदामामध्ये साठवले जाते. शहरात विविध बँका व महत्त्वाची कार्यालये आहेत, परंतु आगीची घटना घडल्यास बाहेरच्या तालुक्यातील अग्निशामक दलाची गाडी मागवावी लागते. तालुक्यात अग्निशामक यंत्र उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी मूल किंवा ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या दलावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात दरवर्षी आगीच्या घटना घडत असताना प्रशासनाने यंत्र खरेदी करण्याचा मानससुद्धा दाखविला नाही. सिंदेवाही शहरात पाच वर्षांपूर्वी नगरपंचायतची स्थापना झाली. त्यामुळे नगरपंचायतीनेही अग्निशामक यंत्रणा खरेदी करण्याचे सौजन्य दाखविले नाही. दरम्यान, नगरपंचायत अग्निशामक वाहन खरेदीचा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठविला असून तो मंजूर झाला आहे. काही महिन्यातच अग्निशामक दलाची गाडी नगरपंचायतीला मिळणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राठोड यांनी दिली.