विदर्भ राज्य जनतेचीच मागणी आहे
By Admin | Updated: April 23, 2016 00:52 IST2016-04-23T00:52:19+5:302016-04-23T00:52:19+5:30
विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी फक्त काहीची मागणी आहे. जनतेची मागणी नाही, असा गैरसमज पश्चिम महाराष्ट्रातील नेते सर्वदूर पसरवित आहेत.

विदर्भ राज्य जनतेचीच मागणी आहे
श्रीहरी अणे : ब्रह्मपुरीत ‘मी विदर्भ बोलतोय’ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्रह्मपुरी : विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी फक्त काहीची मागणी आहे. जनतेची मागणी नाही, असा गैरसमज पश्चिम महाराष्ट्रातील नेते सर्वदूर पसरवित आहेत. पण तो गैरसमज दूर करुन विदर्भ राज्य निर्माण व्हावे, ही जनतेचीच मागणी आहे, हे विरोध करणाऱ्यांनी समजून घ्यावे, अशी स्पष्टोक्ती अॅड. श्रीहरी अणे यांनी केली.
ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या ‘मी विदर्भ बोलतोय’ सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. वामनराव चटप, अॅड. अनिल किलोर, नितीन रोंगे, अॅड. मुकेश समर्थ, किशोरसिंह बैस, अॅड. नंदा पराते, सतीश इटकेलवार, प्रमोद बनकर, अॅड. विजय खांदेवाले, बंडू धोतरे, अशोक रामटेके, अॅड. गोविंद भेंडारकर, सुधील सेलोकर, सुखदेव प्रधान आदी विदर्भलढ्याच्या विचारपीठावर उपस्थित होते.
अॅड. श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील नेते अनेक गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी होत असलेला गैरसमज समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या जंतरमंतर सभेत विदर्भातून तीन हजार महिला उपस्थित होत्या. यापूर्वी जनमंचने मतदान घेतले असता विदर्भातील जनतेने ९० टक्के मतदान विदर्भाच्या बाजूने केले आहे. मग ही मागणी जनतेची कशी नाही, याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. विदर्भ राज्य होणे हा भाषिक वाद नाही. विदर्भात जंगल, जमीन, वीज, पाणी, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आपल्या खांद्यावर भार देऊन प. महाराष्ट्र व मुंबई मजा मारीत आहे. नोकऱ्या, सिंचन, निधी हे सर्व प. महाराष्ट्राने पळविले आहे. विदर्भ आर्थिकदृष्टया संपन्न आहे. शेतकऱ्यांविषयी बोलताना म्हणाले की, आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल व आत्महत्या होणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. तर अॅड. अनिल किल्लोर, अॅड. वामनराव चटप, अॅड. नंदा पराते, किशोरसिंह बैस, अशोक रामटेके आदींनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. गोविंद भेंडारकर, परिचय सुधीर सेलोकर, संचालन प्रा. डॉ. युवराज मेश्राम तर आभार प्रधान यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)