मूल शहरात चोऱ्या वाढल्या; पोलिसांनी गस्त वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST2021-08-18T04:34:03+5:302021-08-18T04:34:03+5:30
मूल पोलिसांची गस्त सुरू असतानाही काही चोरटे पोलिसांची नजर चुकवून चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मूल येथील ...

मूल शहरात चोऱ्या वाढल्या; पोलिसांनी गस्त वाढवावी
मूल पोलिसांची गस्त सुरू असतानाही काही चोरटे पोलिसांची नजर चुकवून चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मूल येथील पंचायत समितीच्या मागील भुसकडे शिक्षक यांचे चारचाकी वाहन चोरीला गेले. तालुक्यातील उसराळा, करवण आणि काटवण येथील शेतकऱ्यांनी बांधून ठेवलेल्या शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. ११ ऑगस्ट रोजी बस स्थानकासमोर ट्रॅव्हल्स उभी असताना त्या ठिकाणचे जाॅक चोरटे चोरून नेत होते. वाहक आणि चालकांनी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वल्केवार व विद्यमान उपसभापती जयश्री वल्केवार यांच्या घरून १२ ऑगस्ट रोजी दोन दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. मागील महिन्यात मूल शहरातील मुख्य रस्त्यावर उभा असलेला ट्रक चोरट्यांनी चोरून नेला. मात्र, पोलिसांच्या समयसूचकतेमुळे ट्रक पकडण्यात आला. मूल शहरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनामधून पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या घटना घडत आहे, याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या घटना बघता, पोलीस प्रशासनाने पोलिसांच्या गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी मूल जनरल व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्यासह क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, पोलीस अधीक्षक यांना सादर केले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल टहलियानी, जितेंद्र तंगडपल्लीवार, लवनिष उधवानी, संजय चिंतावार, निरज नागरेचा उपस्थित होते.