पहाटेच्या अंधारात रेतीची चोरी
By Admin | Updated: March 18, 2015 01:16 IST2015-03-18T01:16:57+5:302015-03-18T01:16:57+5:30
सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत.

पहाटेच्या अंधारात रेतीची चोरी
सावली: सावली तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे तालुक्यातील रेती माफीया पहाटे तीन वाजतापासूनच रेती घाटांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
२०१२ नंतर अजुनही सावली तालुक्यातील बोरमाळा एक व दोन, साखरी, हरांबा, मोहाळ चक, सिर्सी या सहा घाटांचा लिलाव झाला नाही. महसूल प्रशासनाच्या निर्णयानुसार या सहाही घाटांच्या लिलावाची ठरविण्यात आलेले प्राथमिक किंमत लिलावधारकांच्या आवाक्याबाहेर असल्याने लिलावात बोली बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सदर घाटांचा लिलाव २०१२ नंतर आजपर्यंतही झाला नाही. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफीयांनी पहाटेच्या प्रहरापासून रेती चोरण्याचा उपद्रव अविरतपणे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून शासनाला कोट्यवधीचा चुना लागला आहे. एका वर्षासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल या सहाही घाटांमधून शासनाला मिळतो. बोली रक्कम जास्त असल्यामुळे कोणी लिलावात भाग घेत नाही, ही बाब लक्षात आल्याने शासनाने निर्धारित रकमेत २५ टक्क्यांनी कपात केली आहे. तरीही लिलावात उतरण्यासाठी कोणीही कंत्राटदार धजावले नसल्याची माहिती आहे.
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर सहा रेती घाट असून येथील रेती बांधकामाच्या दृष्टीने उच्च दर्जाची मानली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात मागणी असुनही वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीची असल्यामुळे या घाटावरुन रेतीचा फारसा उपसा केला जात नाही असा समज आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या मते त्या घाटांची निर्धारीत रक्कम ही अधिकच असल्याचे सांगितले जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा रेती माफीया मोठ्या प्रमाणात घेत असतानाच कर्मचारीही आपले हितसंबंध जोपासत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगते यांनी धडक मोहीम राबवून काही ट्रॅक्टर चालकांवर दंड ठोठावला. त्यातून तीन लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. मात्र महसूल प्रशासन रेती माफीयांवर जरब बसविण्यात हतबल झाले आहे.
महसूल प्रशासनातील यंत्रणा तोकडी असल्यामुळे रेती माफीयांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. प्रशासनात अनेक कामे असल्यामुळे दररोज पहाटे उठून रेती चोरट्यांचा ट्रॅक्टर पकडून त्यांना दंड ठोठावणे शक्य नाही. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर पकडण्याचा अधिकार आहे. परंतु अनेक कर्मचारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. काही कर्मचारी वैयक्तिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे मी एकटीच कुठे कुठे लक्ष देऊ आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊ अशी अगतिकता सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)