लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा-गोवरी मार्गावर शनिवारी सकाळच्यासुमारास गोवरी व रामपूर गावाजवळ कोळसा वाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैलांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याच्या दोन घटना घडल्या. यात गोवरी येथील संतप्त नागरिकांनी पाच तास चक्का जाम आंदोलन करून वाहनांचे आवागमन रोखून धरले. शेतकऱ्यांना आर्थिक रोख मदत मिळाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शनिवारी सकाळी गोवरी येथील शेतकरी विकास आबाजी पिंपळकर यांचा शेतगडी बैलबंडी घेऊन शेताकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैलबंडीला धडक दिली. यात बैलबंडी झाडाला जाऊन धडकली. ट्रकच्या धडकेने बैल अतिशय गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर ट्रकचालकाने पळ काढला. नागरिकाने त्या वाहनाचा पाठलाग केला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी जमा झाले व सकाळी ७ वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. विकास पिंपळकर, शिवराम पाटील-लांडे, अनिल बोबडे व गावातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. शेतीच्या हंगामातच बैलाला बैलजोडीला धडक दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर आर्थिक मदत मिळेपर्यंत गावकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. गावकरी व ट्रान्सपोर्ट मालक मध्यस्थीनंतर विकास आबाजी पिंपळकर यांना ट्रान्सपोर्ट मालकाने ४५ हजारांची रोख मदत केली. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. अशीच घटना रामपूर येथे घडली. गोवरी येथील शेतकरी सुधाकर परसूटकर यांनी आपला बैल शनिवार बाजार राजुरा येथे विक्रीकरिता आणताना रामपूरजवळ जे. के .ट्रान्सपोर्टच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत बैल निकामी झाला आहे. शिवसेनीचे बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि ट्रान्सपोर्ट मालकाकडून पीडित शेतकऱ्याला ४० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.